नऊ वर्षात कृषी क्षेत्राच्या तरतुदीत पाचपटीने वाढ – पंतप्रधान मोदी | पुढारी

नऊ वर्षात कृषी क्षेत्राच्या तरतुदीत पाचपटीने वाढ - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: मागील नऊ वर्षाच्या कालावधीत कृषी क्षेत्राच्या तरतुदीत पाचपटीने वाढ झाली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.२४) वेबिनारच्या माध्यमातून दिली. मागील आठ वर्षांप्रमाणे या वेळचा केंद्रीय अर्थसंकल्प सुध्दा कृषी केंद्रित असल्याचे सांगितले. तसेच तेलबिया आणि खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्भरता देखील कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.

आम्ही सत्तेत आलो तेव्हा कृषी क्षेत्रासाठीची तरतूद केवळ 25 हजार कोटी रुपये इतकी होती. मात्र आता ती पाचपटीने वाढून सव्वा लाख कोटी रुपयांवर गेलेली आहे. याशिवाय धान्य आणि तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकार मिशन मोडवर काम करीत आहे, असे मोदी यांनी सांगितले.

खाद्यतेलाच्या आयातीवर देशाला वर्षाला सुमारे 1.5 लाख कोटी रुपये खर्च करावे लागतात. हा खर्च आगामी काळात कमी केला जाणार आहे, असे मोदी यांनी नमूद केले. अर्थसंकल्पात कृषी प्रौद्योगिकी स्टार्टअप्सवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 9 वर्षाआधी या क्षेत्रातील स्टार्टअप्सची संख्या नगण्य होती. ती आता तीन हजारांवर पोहोचली आहे, अशी माहितीही मोदी यांनी दिली. केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदी 11 मार्चपर्यंत एकूण 12 वेबिनार घेणार आहेत.

हेही वाचा:

Back to top button