Air India Bid : टाटांची बोली मंजूर झाल्याचा दावा मोदी सरकारने फेटाळला ! | पुढारी

Air India Bid : टाटांची बोली मंजूर झाल्याचा दावा मोदी सरकारने फेटाळला !

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : Tata Sons Winning Air India Bid :  सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा समूहाची बोली मंजूर झाल्याचे वृत्त सरकारने फेटाळून लावले आहे.

आज दिवसभर माध्यमांमध्ये अशा बातम्या आल्या की एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा समूहाची आर्थिक बोली स्वीकारण्यात आली आहे. केंद्राने शुक्रवारी सांगितले की, अहवालांमध्ये असे म्हटले जात आहे की सरकारने एअर इंडियाच्या आर्थिक बोलीला मान्यता दिली आहे, जे चुकीचे आहे.

डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट (डीआयपीएएम) ने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीच्या प्रकरणात सरकारने आर्थिक बोली मंजूर केल्याचे संकेत देणाऱ्या बातम्या माध्यमांमध्ये आहेत, जे चुकीचे आहे.” विभागाकडून असे सांगण्यात आले आहे की, जेव्हाही यासंदर्भात सरकारकडून निर्णय घेतला जाईल, तेव्हा माध्यमांना माहिती दिली जाईल.

Tata Sons Winning Air India Bid : टाटा समूह आणि स्पाइसजेटने एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी आर्थिक निविदा सादर केल्या आहेत. टाटा आणि स्पाइसजेटच्या आर्थिक बोलींचे मूल्यमापन सुरू करण्यात आल्याचे सरकारने नुकतेच सांगितले होते. यासह सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनीच्या खासगीकरणाची प्रक्रिया पुढील टप्प्यात गेली. हा करार लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार उत्सुक आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक बोलींचे मूल्यमापन अज्ञात राखीव किंमतीच्या आधारे केले जात आहे. ज्या बोलीमध्ये प्रस्तावित किंमत प्रमाणित किंमतीपेक्षा जास्त असेल, ती स्वीकारली जाईल. जर टाटाची बोली यशस्वी झाली, तर एअर इंडिया ६७ वर्षांनंतर मीठापासून ते सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीकडे परत जाईल.

उल्लेखनीय म्हणजे, टाटा समूहाने ऑक्टोबर १९३२ मध्ये टाटा एअरलाईन्स नावाने एअर इंडियाची स्थापना केली. सरकारने १९५३ मध्ये विमान कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले. टाटा आधीपासूनच सिंगापूर एअरलाइन्सच्या सहकार्याने विमान विस्तार विस्तार करत आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button