छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमणार राजधानी दिल्ली | पुढारी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमणार राजधानी दिल्ली

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी प्रमाणे यंदाही दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात साजरी केली जाणार आहे. शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती, दिल्लीच्या वतीने तसेच महाराष्ट्र सदन आयुक्तालयाच्या सहकार्याने आयोजित या शिवजन्मोत्सव सोहळ्याला माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या कुटुंबियांसह उपस्थित राहतील. पारंपरिक वेशभूषेतील शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत ‘जय शिवराय’च्या जयघोषाने राजधानी दुमदुमणार आहे. विशेष म्हणजे ‘शिवराय ढोल पथक’ नाशिक कडून महाराजांना मानवंदना देण्यात येईल.

रविवारी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी परंपरेनुसार शिवजन्मोत्सवासाठी पाळणा पुजन केले जाईल. शिवजन्मोत्सव सोहळ्यानंतर चिमुकल्या शिवभक्तांकडून शिवविचारांचे सादरीकरण केले जाणार असल्याची माहिती शिवजयंती राष्ट्रोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे. यासोबतच नवीन महाराष्ट्र सदनातील परिसरात असलेल्या छत्रपतींच्या पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करीत त्यांना मानवंदना देण्यात येईल.

हेही वाचा 

Back to top button