नवी दिल्ली: एमसीडी महापौर निवडीसाठी २२ फेब्रुवारीला बैठक | पुढारी

नवी दिल्ली: एमसीडी महापौर निवडीसाठी २२ फेब्रुवारीला बैठक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील महानगर पालिकेच्या (एमसीडी) निवडणुकांचा निकाल लागून दोन महिने लोटले असले, तरी अद्याप महापौरांची निवड झालेली नाही. गेल्या दोन महिन्यांमध्ये महापौर निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या तीन बैठका सभागृहातील अभूतपूर्व गोंधळामुळे स्थगित करण्यात आल्या होत्या. येत्या २२ फेब्रुवारला चौथ्यांदा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सत्ताधारी आम आदमी पक्ष तसेच विरोधी पक्ष भाजपने सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू दिले. तर पालिकेला नवीन महापौर मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठवलेल्या प्रस्तावाला नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मंजुरी दिली आहे.

केजरीवाल यांनी रविवारी सकाळी नायब राज्यपालांना पत्र पाठवून २२ फेब्रुवारीला महापौरपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी केली होती. या प्रस्तावाला त्यांनी मंजुरी दिल्याने आता बुधवारी सकाळी ११ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. एमसीडी सभागृहात या दिवशी महापौर, उपमहापौर तसेच स्थायी समितीच्या सहा सदस्यांसाठी निवडणूक घेतली जाईल.

एमसीडी निकालानंतर महिन्याभरानंतर ६ जानेवारीला पहिल्यांदा महापौर निवडीसाठी सभागृहाची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु, सभागृहातील गोंधळामुळे कामकाज स्थगित करण्यात आले होते. यानंतर २४ जानेवारी आणि ६ फेब्रुवारीला बैठक बोलावण्यात आली होती. परंतु, गोंधळामुळे या बैठकीचे कामकाज देखील स्थगित करण्यात आले होते. १६ फेब्रुवारीला पुन्हा बैठक बोलावण्यात आली होती. परंतु, आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. त्यामुळे बैठक घेण्यात आली नव्हती. आता न्यायालयाने बैठक घेण्याचे आदेश दिल्याने महापौर निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा 

Back to top button