पुढारी ऑनलाईन डेस्क : टाटाच्या मालकीच्या एअर इंडियाचा (Air India) विमान निर्माती कंपनी बोईंग (Boeing) आणि एअरबसशी (Airbus) झालेल्या करारांमुळे भारतात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे २ लाख नोकऱ्या निर्माण होतील, असे विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या करारानुसार, सध्या १४० विमानांचा ताफा असलेली एअर इंडिया कंपनी बोईंग आणि एअरबसकडून ४७० विमाने खरेदी करणार आहे. (Air India mega deal with Boeing and Airbus)
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, या करारांमुळे भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात नोकऱ्यांची मोठी संधी निर्माण होईल. कारण एअरलाइनला सहाय्यक कामे करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ मार्टिन कन्सल्टिंगचे सीईओ मार्क मार्टिन यांनी म्हटले आहे की, "ज्या नोकऱ्या निर्माण केल्या जातील त्यात दोन पैलू आहेत. ते म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार होय. नॅरो- बॉडी विमानासाठी एकूण थेट आणि अप्रत्यक्ष नोकर्या सुमारे ४०० असतील आणि वाइड-बॉडी विमानासाठी सुमारे ६००-७०० मनुष्यबळाची गरज लागेल."
"थेट रोजगारामध्ये थेट एअरलाइनद्वारे कार्यरत असलेल्यांचा समावेश असेल. उदा. पायलट, केबिन क्रू, सर्व तांत्रिक आणि गैर-तांत्रिक कर्मचारी. नॅरो- बॉडी विमानासाठी सुमारे १७५ मनुष्यबळ असेल." तर वाइड-बॉडी विमानाबाबत विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात की, "वाइड-बॉडीच्या बाबतीत प्रत्यक्ष २५० ते ३०० नोकऱ्या असतील आणि अप्रत्यक्ष रोजगाराचा समावेश केल्यानंतर ही संख्या ६०० ते ७०० पर्यंत जाऊ शकते. यामुळे असा निष्कर्ष काढू शकतो की यातून सुमारे २ लाख २ हजार ते २ लाख ९ हजार नोकऱ्यांची निर्मिती होईल."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी एअर इंडियाकडून २२० बोईंग BA.N विमाने खरेदी करण्याच्या कराराचा ऐतिहासिक करार असा उल्लेख केला आहे. टाटा समूहाचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे की, एअर इंडिया एअरबस कंपनीकडून २५० विमाने खरेदी करणार आहे. यामध्ये ४० वाइड- बॉडी ए-३५० विमाने आणि २१० नॅरो- बॉडी विमानांचा समावेश आहे. ऑर्डर वाढवण्याचा पर्यायही करारात ठेवण्यात आला आहे. (Air India mega deal with Boeing and Airbus)
हे ही वाचा :