उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सहानुभूती मिळवण्यासाठी : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंचा दावा | पुढारी

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सहानुभूती मिळवण्यासाठी : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंचा दावा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचे नेते खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी नवीन महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर टिकास्त्र डागले. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही पत्रकार परिषद घेतली असून त्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे, असा दावा शेवाळे यांनी केला.

निवडणूक आयोगाने १९९८ मध्ये पक्षात घटनेनूसार लोकशाही प्रक्रियेचे पालन केले जात नसल्याचे सांगत शिवसेना प्रमुखांसोबत ३० वेळा पत्रव्यवहार केला होता. आयोगाचा पक्षाच्या घटनेवर आक्षेप होता.अशात पक्षाची नोंदणी रद्द करण्याचा इशारा आयोगाने देताच बाळासाहेब ठाकरेंनी पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रिया पार पाडू अशी हमी दिली होती, असा दावा शेवाळे यांनी केला.

बाळासाहेबांनी हमी दिल्यानंतर ज्या नियुक्त्या झाल्या त्या लोकशाही मार्गाने झाल्या.२०१३ आणि २०१८ नंतर शिवसेनाप्रमुख पद तसेच ठेवत शिवसेना पक्षप्रमुखपद निर्माण करण्यात आले.अनिल देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे पक्षांतर्गत निवडणूक होते,अर्ज मागविले जातात. पंरतु, २०१३ आणि २०१८ मध्ये कुणी अर्ज केला? असा सवाल उपस्थित करीत पक्षप्रमुख पदासाठी तेव्हा आमचा उद्धव ठाकरेंचा पाठिंबा होता,असे स्पष्ट केले. पंरतु, नेते, उपनेते, विभाग प्रमुख, संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुखांसाठी मतदान झाले का? असा सवाल शेवाळे यांनी उपस्थित केला.मुंबईच्या गटप्रमुखांनी कधी मतदान करून शाखा अध्यक्ष ते नेते पदासाठी मतदान केले का? असा सवाल देखील यावेळी शेवाळे यांनी विचारला.

उद्धव ठाकरे आणि सचिवांनी मिळून सर्व नियुक्त्या केल्या, त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून कुठल्याही नियुक्त्या झाल्या नाहीत, असा आरोप शेवाळे यांनी केला.सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल त्यांना माहिती नाही हे अगदी दुर्देवी असल्याचेही शेवाळे म्हणाले.शिवसेनेत अजून कुठलीच निवडणूक झाली नाही,त्यांनी सांगितले तशी प्रक्रिया झाल्याचे त्यांनी सिद्ध करावे, असे आव्हान शेवाळे यांनी दिले. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबतची युती तोडली होती. पंरतु,आता शिवसैनिकालाच भाजपने अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री केले आहे. आता ठाकरे यांच्या मागणीत काही राहीले नाही,असे देखील शेवाळे म्हणाले.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button