

पुढारी ऑनलाईन: तुर्की-सीरियामध्ये सोमवारी (दि.०६) झालेल्या शक्तीशाली भूकंपानंतर प्रचंड मनुष्य आणि वित्त हानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आत्तापर्यंत दोन्ही देशांमधील ९ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. जखमींची संख्या ४० हजारांपर्यंत पोहचली आहे. दरम्यान, येथील हवामानाचा बचावकार्यावर मोठा परिणाम होत आहे. मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने, गोठणाऱ्या थंडीमुळे मदतकार्यात अडथळा निर्माण झाला असल्याचे आपत्कालीन व्यवस्थापन प्रेसीडेंसीने (AFAD) सांगितले आहे.
शक्तीशाली भूकंपामुळे रस्ते उखडले गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पोहोचणेही कठीण झाले आहे. शक्तीशाली भूकंपाने प्रभावित झालेल्या भागात वेळेत मदत मिळण्यास अडचण येत आहे. या प्रभावित भागातील काही कुटुंबांनी सांगितले की, बचाव प्रयत्नांची गती कमी आहे. नातेवाईकांना शोधण्यासाठी कोणत्याही स्वरुपाची मदत मिळाली नाही. या भूकंपाने ज्यांचा निवारा उद्ध्वस्त उद्वस्थ झाला आहे त्यांना थंड हवामानाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, एका ६४ वर्षीय वृद्धाने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, 'आम्ही भूकंपातून वाचलो; पण आता येथील उपासमार किंवा थंडीमुळे मरणार आहोत.'
शक्तीशाली भूकंपाचा तडाखा बसलेल्या तुर्की आणि सीरियात अद्याप हजारो नागरिक ढिगार्याखाली अडकले आहेत. कित्येक तासानंतरही मृतदेह मिळत असून, युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. गंभीर जखमींना हवाई दलाच्या मदतीने उपचारासाठी अन्यत्र हलवले जात आहे.
शक्तिशाली भूकंपानंतर दक्षिण तुर्की आणि उत्तर सीरियाच्या अनेक भागात बचावकार्य वेगाने सुरू आहे. पण तुर्कीसह अनेक देशात पाऊस आणि बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान, तुर्कीतील बचावकार्यात बर्फवृष्टीमुळे प्रचंड अडथळे येत असून, इमारतींच्या ढिगार्याखालून माणसांना जिवंत काढणे कठीण झाले आहे. यातूनही अनेक देशांच्या सहाय्याने येथील मदत यंत्रणा वेगाने बचावकार्य करत आहे. तसेच तुर्की आणि सीरियातील भूकंपबळींची संख्या दहा हजार होण्याची भीती येथील यंत्रणेकडून वर्तवली जात आहे.
तुर्की भूकंपावर बोलताना जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, 'अशा भूकंपाच्या घटनांमध्ये सुरुवातीला मृतांची आणि जखमींची संख्या ही कमीच असते. पण कालांतराने ही संख्या वेगाने वाढते. तुर्कीतील भूकंपामुळे बेघर झालेल्यांची परिस्थितीही अशीच आहे. दरम्यान तुर्कीत भूकंपाचे धक्के बसणे सतत सुरूच असून, यामुळे लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील तापमानात देखील प्रचंड बदल जाणवत आहेत. सतत पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे थंडी देखील वाढली आहे. त्यामुळे बेघर झालेल्या लोकांवर व अन्य नागरिकांवर याचा परिणाम होऊन आणखी अडचणी वाढून, मृतांची संख्या 'आठ' पटीने वाढू शकते असे WHO ने म्हटले आहे.