Business : इलेक्ट्रिक कारसाठी चार्जिंग स्टेशन सुरू करायचंय? | पुढारी

Business : इलेक्ट्रिक कारसाठी चार्जिंग स्टेशन सुरू करायचंय?

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : Charging Station Business : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता लोकांची पसंती वेगाने इलेक्ट्रिक वाहनांकडे जात आहे. इंधनाच्या किंमतींव्यतिरिक्त, बरेच लोक पर्यावरणाच्या सुरक्षिततेचा विचार करून इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.

येणारा काळ हा फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा असणार आहे यात काही शंका नाही. या पर्वाचा आता शुभारंभ दणक्यात झाला आहे. आता रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असल्याने, ही वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशनचीही गरज निर्माण झाली आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचा सध्याचा काळ पाहता, चार्जिंग स्टेशन सुरू करणे देखील गुंतवणूकीच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर ठरत आहे. जेव्हा काही वर्षांनी इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढेल तेव्हा तुमचा नफा तितक्याच वेगाने वाढत जाईल.

कमाईसाठी चार्जिंग स्टेशन हा उत्तम पर्याय असू शकतो..

चार्जिंग स्टेशन हे कमाईचे एक असे भविष्य आहे जे आपले उत्पन्न वाढवू शकते. आज आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उघडण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगू. या व्यवसायाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती तुम्हाला कमी खर्चात मोठा नफा देईल.

EV चार्जिंग स्टेशन बसवण्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत, त्या लक्षात घेऊन तुम्ही चार्जिंग स्टेशन उघडू शकता. पेट्रोल पंपासारखे चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी तुम्हाला सध्यातरी परवान्याची गरज नाहीय. त्यामुळे कोणताही सामान्य माणूस चार्जिंग स्टेशन सुरू करू शकतो.

चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी ‘या’ आहेत अटी..

ऊर्जा मंत्रालयाच्या मते, इलेक्ट्रिक वाहनांसाठी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये सर्व संबंधित सबस्टेशन उपकरणांसह एक विशेष ट्रान्सफॉर्मर असावा. ज्यात प्लग-इन नोजल, 33/11 केव्ही केबल, सुरक्षितता लक्षात घेऊन सर्किट ब्रेकर असावा.

चार्जिंग स्टेशनमध्ये किमान एक इलेक्ट्रिक कियोस्क असणे देखील आवश्यक आहे, ज्यामध्ये अनेक चार्जिंग पॉइंट्स असावेत तसेच गरजेनुसार वाढवता येते.

लांब पल्ल्याच्या आणि अवजड वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनवर 100 किलोवॅटचे दोन चार्जर असणे आवश्यक आहे. तथापि, बससारख्या अवजड वाहनांसाठी, बस डेपोजवळील चार्जिंग स्टेशनला प्राधान्य दिले जाईल.

जर तुम्हाला फास्ट चार्जर बसवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या चार्जिंग स्टेशनवर लिक्विड कूल्ड केबलचा वापर करावा लागेल जेणेकरून वाहनाची बॅटरी चार्ज होईल.

इलेक्ट्रिकल निरीक्षकाची (इन्स्पेक्टर) मंजुरी आवश्यक…

सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी, इलेक्ट्रीकल निरीक्षकाद्वारे (इन्स्पेक्टर) जारी केलेल्या मंजुरीची आवश्यकता असेल. या निरीक्षकाची नियुक्ती स्थानिक वितरण कंपनीद्वारे केली जाते.

चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी जमीन भाड्याने देखील घेतली जाऊ शकते. यासाठी आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. स्टेशनवर बसवलेली सर्व उपकरणे ISO प्रमाणित असणे आवश्यक आहे.

चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी किती खर्च येईल…

सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आपल्याकडे किमान ३०० ते ५०० चौरस फूट जागा असावी, जेणेकरून एका वेळी 2-3 कार सहजपणे चार्ज करता येतील.

फास्ट चार्जिंग स्टेशन बसवण्यासाठी १६.५ लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. यात वीज, सिव्हिल वर्क, मेंटेनन्स, चार्जिंग उपकरणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. जर तुम्ही तुमचे चार्जिंग स्टेशन १६ तास चालवले तर तुम्ही चौथ्या वर्षीच ३.५ रुपये प्रति युनिट दराने तुमची संपूर्ण किंमत वसूल करू शकता.

सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी, तुम्हाला तुमच्या राज्याच्या ऊर्जा विभागाशी संपर्क साधावा लागेल. या व्यतिरिक्त, तुम्ही टाटा पॉवर, डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स, इव्हॉल्ट, पॅनासोनिक सारख्या चार्जिंग स्टेशन स्थापित करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधू शकता. या अर्थाने, चार्जिंग स्टेशन सुरू करणे ही एक नवा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना असू शकते.

Back to top button