नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा -देशात अदानी समुहासंबंधी अमेरिकेतील हिंडनबर्ग फर्मने जाहीर केलेल्या अहवालानंतर वादंग निर्माण झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रकरणात पुन्हा एकदा सरकारची भूमिका स्पष्ट केली. या संपूर्ण प्रकरणावर नियामक मंडळ लक्ष ठेवून आहे. बाजाराला स्थिर ठेवण्याचे कार्य करण्यासाठी ते पूर्णत: स्वतंत्र आहेत, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात नियामक मंडळ त्यांचे काम करतील. बाजारातील सर्वोत्तम स्थितीत कायम ठेवण्याचे काम भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाचे (सेबी) आहे. या स्थितीला कायम ठेवण्यासाठी त्यांच्याकडे माध्यम आहे. अदानी समुहाकडून फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) मागे घेण्यात आल्यानंतर भारताच्या प्रतिमेवर कुठलाही प्रभाव पडलेला नाही, असे देखील अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
याप्रकरणावर आरबीआय, स्टेट बॅंक तसेच एलआयसीने त्यांचे सविस्तर निवेदन जाहीर केले आहे.देशात यापूर्वी एफपीओ मागे घेण्यात आले नाहीत का? एफपीओ मागे घेण्यात आल्याने देशाच्या प्रतिमेवर किती प्रभाव पडला? मागे घेण्यात आलेले एफपीओ पुन्हा बाजारात आले नाहीत असे किती वेळा झाले? असे सवाल अर्थमंत्र्यांनी उपस्थित करीत एफपीओ येत-जात राहतात. प्रत्येक बाजारात अस्थिरता असते, हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला.
देशाच्या परकीय चलन साठ्यात गेल्या २ दिवसांमध्ये ८ अब्ज डॉलर्स आले आहेत. अशात भारत आणि त्याच्या बळकटीची प्रतिमा कायम असल्याचे सिद्ध होते, असे सीतारामन म्हणाल्या.
हेही वाचा :