हवाई वाहतूक कंपन्यांना ५४६ वेळा करावा लागला तांत्रिक समस्यांचा सामना : केंद्राची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा -हवाई वाहतूक कंपन्यांना गेल्यावर्षी 546 वेळा तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला असल्याची माहिती केंद्र सरकारकडून गुरुवारी लोकसभेत देण्यात आली. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सर्वाधिक २१५ वेळा, स्पाईसजेटला १४३ वेळा तर विस्तारा कंपनीला ९७ वेळा तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
गतवर्षी खाजगीकरण झालेल्या एअर इंडियाला 64 वेळा, स्व. राकेश झुनझुनवाला यांनी स्थापन केलेल्या आकाश एअर विमान कंपनीला 7 वेळा तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला. याशिवाय एअर एशिया इंडियाला 8 वेळा, अलायन्स एअरला 3 वेळा, फ्लाय बिग, ट्रू जेट व ब्लूडार्ट एवि्हएशन यांना प्रत्येकी एकदा तांत्रिक समस्येला सामोरे जावे लागले. गत दोन वर्षांचा विचार केला तर या कालावधीत विमान कंपन्यांना 1 हजार 90 वेळा तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.
वर्ष 2021 मध्ये 544 वेळा तर 2022 मध्ये 546 वेळा तांत्रिक समस्या उद्भवल्या. लो कॉस्ट विमान कंपन्यांना जास्त प्रमाणात तांत्रिक समस्यांशी मुकाबला करावा लागत आहे का, असे विचारले असता हवाई वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी त्याचे नकारार्थी उत्तर दिले.
हेही वाचा :
- Share Market Updates | IT स्टॉक्स तेजीत, पण अदानी एंटरप्रायझेसचा शेअर २६ टक्क्यांनी गडगडला
- Nitin Gupta : नव्या कर व्यवस्थेचा होणार जास्तीत जास्त करदात्यांना फायदा: सीबीडीटी चेअरमन नीतीन गुप्ता
- Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या विजयी चौकाराने रोहित शर्माच्या अडचणीत वाढ!