Hindenburg Research : गौतम अदानींना ४५ हजार कोटींचा दणका देणारे कोण आहेत नॅथन ॲंडरसन | पुढारी

Hindenburg Research : गौतम अदानींना ४५ हजार कोटींचा दणका देणारे कोण आहेत नॅथन ॲंडरसन

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) नकारात्मक अहवालामुळे बुधवारी अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहण्यास मिळाले. त्यामुळे भारत आणि आशियातील सर्वात मोठे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना ४५ हजार कोटींचा फटका बसला. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, अदानी यांची संपत्ती ११३ अब्ज डॉलरवर आली आहे आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ते चौथ्या क्रमांकावर घसरले गेले आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहात सर्व काही ठीक नसल्याचा दावा करण्यात आला आहे. हा समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतलेला आहे. मात्र, अदानी समूहाने हा अहवाल खोटा असून एफपीओ आधी आपणास बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा दावा समूहाकडून करण्यात आहे. अदानी समूहाचा 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ शुक्रवारी उघडत आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) आतापर्यंत अनेक कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे. याची स्थापना 2017 मध्ये नॅथन अँडरसन (Nathan Anderson) यांनी केली होती. ही फॉरेन्सिक आर्थिक संशोधन संस्था आहे, जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण करते. 6 मे 1937 रोजी झालेल्या हायप्रोफाइल हिंडेनबर्ग एअरशिप क्रॅशवरून कंपनीचे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी येथील मँचेस्टर टाऊनशिपमध्ये हा अपघात झाला होता. . हिंडेनबर्ग रिसर्च कोणत्याही कंपनीत होणारे गडबड शोधते आणि नंतर त्याबद्दलचा अहवाल प्रकाशित करते. कंपनीच्या वेबसाइटवर असे म्हटले आहे की ती मानवनिर्मित आपत्तींवर लक्ष ठेवते. यामध्ये लेखासंबंधी अनियमितता, गैरव्यवस्थापन आणि अघोषित संबंधित पक्ष व्यवहार यांचा समावेश आहे.

इस्रायलमधील रुग्णवाहिका चालक (Hindenburg Research)

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, नॅथन अँडरसन यांनी कनेक्टिकट विद्यापीठातून (University of Connecticut) इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पदवी मिळवली. यानंतर त्यांनी फॅक्टसेट रिसर्च सिस्टम्स इंक (FactSet Research Systems Inc) डेटा कंपनीमध्ये काम केले. तेथे त्यांचे काम गुंतवणूक व्यवस्थापन कंपन्यांशी संबंधित होते. विशेष म्हणजे नॅथन अँडरसन यांनी इस्रायलमध्ये रुग्णवाहिका चालक म्हणूनही काम केले आहे. प्रचंड दडपणाखाली काम करायला मजा येते, असे त्यांचे म्हणणे आहे.

अँडरसन हे हॅरी मार्कोपोलॉस यांना आपला आदर्श मानतात. मार्कोपोलोस हा एक विश्लेषक आहेत, ज्यांनी बर्नी मॅडॉफची (Bernie Madoff) फसवणूक योजना उघड केली होती. हिंडनबर्गने सप्टेंबर 2020 मध्ये इलेक्ट्रिक ट्रक निर्मात्या निकोला कॉर्प (Nikola Corp) विरुद्ध पैज लावली होती आणि त्यांनी मोठी रक्कम जिंकली होती. मात्र, अँडरसनने ही रक्कम उघड केली नाही. ते म्हणतात की निकोलाने त्याच्या टेक्नोलॉजिकल डेव्हलपमेंट बाबत गुंतवणूकदारांना फसवले.

३६ कंपन्यांमधील फसवणुकीचा पर्दाफाश

गेल्या वर्षी अमेरिकेच्या ज्युरीने निकोलाचे संस्थापक ट्रेव्हर मिल्टन यांना गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल दोषी ठरवले होते. या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी कंपनीला US सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला 12.5 कोटी डॉलर भरावे लागले. निकोलाला जून 2020 मध्ये सूचीबद्ध करण्यात आले आणि काही दिवसांनंतर त्याचे मूल्य 34 अब्ज डॉलर पर्यंत गेले होते. निकोलाने फोर्ड मोटर्सलाही मागे टाकले होते. आता त्याचे मूल्यांकन 1.34 अब्ज डॉलरपर्यंत खाली आले आहे. हिंडेनबर्ग सांगतात की व्हिसलब्लोअर्स आणि कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांनी त्यांना या कामात मदत केली.

अधिक वाचा :

Back to top button