Gautam Adani | गौतम अदानींचे एका दिवसात ६ अब्ज डॉलर उडाले, शेअर्स धडाधड कोसळल्याने संपत्तीत घट | पुढारी

Gautam Adani | गौतम अदानींचे एका दिवसात ६ अब्ज डॉलर उडाले, शेअर्स धडाधड कोसळल्याने संपत्तीत घट

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतांचा बुधवारी भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका बसला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स ८५० अंकांनी खाली आला होता. निफ्टीने १८ हजारांची पातळी गमावून १७,८०० वर व्यवहार केला. दरम्यान, आजच्या व्यवहारात सर्वाधिक फटका अदानी ग्रुपच्या (Gautam Adani) शेअर्संना बसला. आज अदानी ग्रुपचे शेअर्स १० टक्क्यांपर्यंत घसरले. अमेरिकेतील शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या एका नकारात्मक अहवालानंतर बुधवारी अदानींचे शेअर्स धडाधड कोसळले. यामुळे अब्जाधीश गौतम अदानी यांच्या संपत्तीत ५.९ अब्ज डॉलरची घट झाली आहे.

फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार (Forbes Real-Time Billionaires List), ६० वर्षीय गौतम अदानी यांच्या संपत्तीत आज ५.९ अब्ज डॉलरने घट होऊन ती १२०.६ अब्ज डॉलरवर आली आहे. तरीही जगातील श्रीमतांच्या यादीत अदानी यांचे तिसरे स्थान कायम आहे. एकूण संपत्तीत जेफ बेझोस (११९.५ अब्ज डॉलर) आणि वॉरन बफेट (१०८.१ अब्ज डॉलर) यांच्या पुढे अदानी यांचा क्रमांक आहे. जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत अदानी यांच्यासोबत मुकेश अंबानी (८५.८ अब्ज डॉलर) यांचा समावेश आहे.

अदानी ग्रुपमधील (Adani Group) कंपन्या अमेरिकेतील बाँड्स आणि नॉन-इंडियन-ट्रेडेड डेरिव्हेटिव्हजच्या माध्यमातून शॉर्ट सेलिंग करत करत असल्याचे हिंडेनबर्ग फर्मने त्यांच्या रिपोर्टमधून उघड केले आहे. याचा फटका आज अदानींच्या शेअर्सना बसला. अदानी ग्रुपमधील अंबुजा सिमेंटचा शेअर ९.६ टक्के घसरून ४५० रुपयांवर आला. अदानी पोटर्स, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशऩ हे सुमारे ५ टक्क्यांनी खाली आले.

मागील २०२२ वर्षात अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स १२५ टक्क्यांनी वाढले होते. तर पॉवर आणि गॅस युनिट्ससह इतर समूह कंपन्यांचे शेअर्स १०० टक्क्यांपेक्षा अधिक ‍वधारले होते. गेल्या काही वर्षांत अदानी ग्रुपच्या (Gautam Adani) शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.
अमेरिकेची आर्थिक स्थिती दर्शवणाऱ्या डाटामधून मंदीचे संकेत मिळत आहे. आर्थिक मंदीच्या जोखमीने तसेच अनेक कंपन्यांच्या वाढीचा आलेख खाली आल्याने गुंतवणूकदारांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे शेअर बाजारात आज विक्रीचा सपाटा दिसून आला.

 हे ही वाचा :

Back to top button