Gautam Adani: गौतम अदानी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती, जाणून घ्या किती आहे संपत्ती | पुढारी

Gautam Adani: गौतम अदानी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती, जाणून घ्या किती आहे संपत्ती

पुढारी ऑनलाईन : अदानी समूहाचे अध्यक्ष भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती (Gautam Adani) ठरले आहेत. त्यांनी फ्रान्सचे उद्योगपती लुई व्हिटॉनचे प्रमुख बर्नार्ड अर्नाल्ट यांना मागे टाकत जागतिक यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीत आता फक्त अमेरिकेतील आघाडीचे उद्योगपती, टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस अदानींच्या पुढे आहेत. अदानी यांनी तिसरे स्थान मिळवून एक नवा विक्रम रचला आहे.

ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार, 60 वर्षीय गौतम अदानी यांची एकूण संपत्ती सध्या $137.4 अब्ज आहे. यावर्षी त्यांची एकूण संपत्ती $60.9 अब्जने वाढली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या (Gautam Adani) यादीत स्थान मिळविणारे ते पहिले आशियाई भारतीय आहेत. अदानी हे आतापर्यंत आशियातील आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. आता त्यांनी जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांनी फेब्रुवारीमध्ये मुकेश अंबानींनाही मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान मिळवला होता. गेल्या महिन्यात त्यानी मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स यांना मागे टाकत जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर ते पोहोचले होते. मुकेश अंबानी एकेकाळी जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचले होते. मात्र अदानी (Gautam Adani) त्यांच्याही एक पाऊल पुढे गेले आहेत.

गेल्या काही वर्षातच वाढली संपत्ती

गौतम अदानी (Gautam Adani) यांनी अलिकडच्या काही वर्षांतच त्यांचा व्यवसाय लक्षणीयरीत्या वाढवला आहे. त्यांनी डायमंड ट्रेडिंगमधून व्यवसाय सुरू केला, पण नंतर कोळसा व्यवसायही त्यांनी सुरू केला. आज त्यांचा समूह कोळशापासून बंदरे, मीडिया, सिमेंट, अॅल्युमिन आणि डेटा सेंटरपर्यंतच पोहचला आहे. मार्केट कॅपनुसार अदानी समूह हा देशातील दुसरा सर्वात मोठा समूह बनला आहे. हा समूह खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठा बंदर आणि विमानतळ ऑपरेटर आहे. यासोबतच शहर गॅस वितरण आणि कोळसा खाणकामातही पहिल्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा:

Back to top button