Covid Nasal Vaccine : नाकाद्वारे देण्यात येणारी देशातील पहिली लस २६ जानेवारीला होणार लाँच | पुढारी

Covid Nasal Vaccine : नाकाद्वारे देण्यात येणारी देशातील पहिली लस २६ जानेवारीला होणार लाँच

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशांतर्गत लस निर्माती कंपनी भारत बायोटेक 26 जानेवारी रोजी नाकाद्वारे (Covid Nasal Vaccine) देण्यात येणारी देशातील पहिली कोविड-19 लस iNCOVACC लाँच करणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी शनिवारी ही माहिती दिली.

फार्मा कंपन्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. आत्तापर्यंत अनेक लसी बनवल्या गेल्या आहेत आणि अजून नवनवीन प्रयोग सुरू आहेत. देशातील पहिली इंट्रानासल कोविड लस (Covid Nasal Vaccine) 26 जानेवारीला लाँच केली जाणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी भोपाळमधील मौलाना आजाद नॅशनल इंन्स्टट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी 26 जानेवारी रोजी लस लाँच करणार असल्याचे सांगितले. तसेच लम्पी-प्रोविंड आणि जनावरांच्या त्वचेच्या रोगासाठी लस पुढील महिन्यात लाँच होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने दिली मान्यता (Covid Nasal Vaccine)

जगभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 23 डिसेंबर 2022 रोजी भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीला मान्यता दिली होती. ही लस बूस्टर डोस म्हणून वापरली जाऊ शकते. सुरुवातीला, नाकाची लस खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणार आहे. सरकारने ही लस भारताच्या कोविड 19 लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट केली आहे. तत्पूर्वी, भारताचे ड्रग कंट्रोलर जनरल, DCGI यांनी आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकच्या इंट्रानसल कोविड लसीला मान्यता दिली होती. ही लस १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना दिली जाणार आहे. बूस्टर डोस म्हणून दिली जाणारी ही लस ज्यांचे दोन डोस झाले आहेत, त्यांना मिळू शकते. मात्र, त्याला प्राथमिक लसीचीही मान्यता मिळाली आहे. म्हणजेच तुम्ही कोणतीही लस घेतली नसली तरी घेता येणार आहे.

हे ही वाचा :

Back to top button