Manish Sisodia : दिल्लीतील शिक्षकांचा अपमान करू नका : उपमुख्यमंत्री सिसोदियांचे नायब राज्यपालांना पत्र | पुढारी

Manish Sisodia : दिल्लीतील शिक्षकांचा अपमान करू नका : उपमुख्यमंत्री सिसोदियांचे नायब राज्यपालांना पत्र

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : दिल्ली सरकारच्या शाळांबद्दल खोट बोलून नायब राज्यपालांनी शिक्षकांचा अपमान केला आहे, अशी खंत उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी शनिवारी (दि.२१) व्यक्त करीत नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना पत्र लिहिले आहे. राज्य सरकारच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या १४.५ लाखांनी वाढून १८ लाखांपर्यंत पोहोचली आहे. नायब राज्यपालांनी शिक्षकांचा तसेच विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा अपमान करू नये, अशी विनंती सिसोदियांनी पत्रातून केली आहे.

सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या, डीडीए प्लॉट्स, बनवण्यात आलेल्या वर्गखोल्या तसेच निकालांबद्दल नायब राज्यपाल खोटं बोलत आहेत. तासिका शिक्षकांना ‘घोस्ट टिचर’ म्हणून त्यांनी शिक्षकांचा अपमान केला आहे. घटनेनुसार नायब राज्यपालांचे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम आहे. त्यामुळे नायब राज्यपालांनी कायदा-सुव्यवस्था सुधारावी, आम्ही शिक्षण व्यवस्था सुधारू, असे सिसोदिया  (Manish Sisodia) म्हणाले.

शुक्रवारी नायब राज्यपालांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून शिक्षण विभागाबाबत करण्यात येणारे दावे चुकीचे असल्याचा दावा केला होता. पूर्वीच्या तुलनेत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी झाली असून पटसंख्याही घटल्याचा दावा नायब राज्यपालांनी पत्रातून केला होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button