नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : एका वृद्ध महिला प्रवासीवर लघुशंका केल्याच्या आरोपावरून एअर इंडियाने शंकर मिश्रा याच्यावर चार महिन्यांची बंदी घातली आहे. गुरुवारी (दि. १९) हा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याची माहिती समोर आली आहे. एअरलाइनने या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल दिलेला आहे. एअर इंडियाने सुरुवातीला आरोपी शंकरला ३० दिवसांसाठी प्रवास करण्यावर बंदी घातली आहे. तसेच ही परिस्थिती हाताळण्यात ज्या चुका केलेल्या आहेत त्याची चौकशी करण्यासाठी अंतर्गत समिती स्थापन केली आहे.
७ जानेवारी रोजी आरोपी शंकर मिश्रा याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ४ जानेवारी रोजी पीडित महिलेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २९४, ३५४, ५०९, ५१० आणि विमान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. ७ जानेवारी रोजी, दिल्ली पोलिसांनी शंकर मिश्रा याला बेंगळुरू शहरातील संजय नगर भागातून अटक केली, जिथे स्थानिक पोलिसांनी दिल्ली पोलिसांना मदत केली.
गेल्या आठवड्यात १३ जानेवारी रोजी आरोपी शंकर मिश्रा याने दिल्लीतील न्यायालयात सांगितले होते की, आपण हे आक्षेपार्ह कृत्य केले नाही. तसेच महिलेने स्वतःवर लघुशंका केल्याचा आरोप त्याने केले. या कथित घटनेवरून काही सहप्रवाशांनी आरोपीचा निषेध केला आणि घटनेबाबत पीडितेसोबत आरोपीचे व्हॉट्सअॅप मेसेज केले असले तरी, ही घटना घडलीच नसल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला.
४ जानेवारीला नोंदवलेल्या एफआयआरनुसार, शंकर मिश्रा, ज्याने महिला सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप आहे, त्याने पीडितेची माफी मागितली होती आणि आपल्या कृत्यामुळे पत्नी आणि मुलांना त्रास होऊ नये असे म्हणत तिला तक्रार न करण्याचे आवाहन केले होते. एफआयआरनुसार, पीडितेने सांगितले की, तिला आरोपीशी बोलून तिच्या इच्छेविरुद्ध प्रकरण मिटवण्यास सांगितले होते.
हेही वाचा