कुस्तीपटूंची विनंती सरकारपर्यंत पोहोचली, क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाकडून 72 तासांत उत्तर मागितले | पुढारी

कुस्तीपटूंची विनंती सरकारपर्यंत पोहोचली, क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाकडून 72 तासांत उत्तर मागितले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह देशातील कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. कुस्तीपटूंनी आज दुसऱ्या दिवशीही दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन करून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. याची दखल घेत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाकडून ७२ तासांत उत्तर मागितले आहे.

ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल पदक विजेत्यांसह इतर कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आणि अन्य काही प्रशिक्षकांवर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तसेच याप्रकरणाचा निषेध करत बृजभूषण यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. याची गंभीर दखल क्रीडा मंत्रालयाने घेतली आहे. मंत्रालयाने महासंघाच्या कामकाजातील गैरव्यवस्थापनाचे WFI कडे स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच कुस्तीपटूंनी लावलेल्या आरोपांना पुढील ७२ तासांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे की, हे प्रकरण खेळाडूंच्या भवितव्याशी संबंधित असल्याने मंत्रालयाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. जर WFI निर्धारित वेळेत उत्तर दिले नाही तर क्रीडा मंत्रालय राष्ट्रीय क्रीडा विकास संहिता, 2011 च्या तरतुदीनुसार महासंघाविरुद्ध पुढील कारवाई करेल. दरम्यान, 18 जानेवारीपासून सुरू होणारे राष्ट्रीय कुस्ती शिबिर तूर्तास रद्द करण्यात आले आहे. मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, महिला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर 18 जानेवारी पासून लखनऊ येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये 41 पैलवान, 13 प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह सुरू होणार होते, ते रद्द करण्यात येत आहे.

विनेश फोगाटने पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे केली हस्तक्षेपाची मागणी

जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती पैलवान विनेश फोगाट हिने WFI अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग हे अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांना हटविण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह इतर कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतरवर आज धरणे आंदोलन केले. यावेळी विनेश फोगट म्हणाल्या की, मला 10 ते 12 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळ झाल्याबद्दल सांगितले होते. त्यांनी WFI अध्यक्षांनी केलेल्या लैंगिक छळाबद्दल सांगितले होते. मी आता त्यांची नावे सांगू शकत नाही, परंतु जर आपण देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटलो तर मी नावे निश्चितपणे उघड करू शकते.

Rakhi Sawant : राखीच्या मिसकॅरेजच्या वृत्तावर आदिल खानने सोडले मौन

धक्कादायक! मुलबाळ, आर्थिक सुबत्तेसाठी दिली स्मशानातील राख पिण्यासाठी; हाडांची पावडरही लावली खायला

Back to top button