Shahnawaz Hussain : बलात्कार प्रकरणात शाहनवाज हुसैन यांना धक्का : सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली | पुढारी

Shahnawaz Hussain : बलात्कार प्रकरणात शाहनवाज हुसैन यांना धक्का : सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भाजप नेते सैय्यद शाहनवाज हुसैन (Shahnawaz Hussain) यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. २०१८ मध्ये कथित बलात्काराच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात हुसैन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. निष्पक्ष तपासातून काही सिद्ध झाले नाही, तर दोषमुक्त करू, असे न्यायमूर्ती एस. रवींद्र भट तसेच न्यायामूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले.

हुसैन (Shahnawaz Hussain) यांच्याविरोधातील तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. परंतु, तपासातून काहीही हाती लागले नाही. त्यामुळे हे प्रकरण पुढे घेऊ नये, असा युक्तिवाद हुसैन यांचे वकील मुकुल रोहतगी तसेच सिद्धार्थ लुथरा यांच्याकडून करण्यात आला. या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे कुठलेही कारण मिळालेले नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या हुसैन यांची याचिका फेटाळली.

या प्रकरणात यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान संबंधित महिलेकडून करण्यात आलेली तक्रार ही खोटी तसेच दुर्भाग्यपूर्ण आहे, असा तर्क हुसैन यांच्या वकिलाकडून देण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाने ७ जुलै २०१८ मध्ये हुसैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला हुसैन यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button