दिल्लीसह उत्तर भारतात धुक्याचा कहर; २६० रेल्वेगाड्या रद्द | पुढारी

दिल्लीसह उत्तर भारतात धुक्याचा कहर; २६० रेल्वेगाड्या रद्द

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतात धुक्याने कहर केला असून दाट धुक्यामुळे दिल्लीत सोमवारी (दि.९) अनेक ठिकाणी दृश्यता शून्यावर आली होती. दुपारनंतर वातावरणात काहीशी सुधारणा झाली. धुक्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर  (Indian Railway) झाला असून तब्बल २६० गाड्या रेल्वेला रद्द कराव्या लागल्या आहेत.

केवळ दिल्लीच नाही, तर पंजाब, राजस्थान, बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश याठिकाणी कडाक्याची थंडी व धुक्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. ज्या २६०  गाड्या (Indian Railway)  सोमवारी रद्द कराव्या लागल्या, त्यात ८२ एक्सप्रेस, १४० पॅसेंजर गाड्या तर ४० उपनगरीय गाड्यांचा समावेश होता. धुक्यामुळे रविवारी देखील मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या.

पंजाबमधील भटिंडा तसेच आग्रा येथे दृश्यता शून्यावर आली होती. पतियाला, चंदीगड, अंबाला, भिवनी, सफदरजंग, रिज, गंगानगर, वाराणशी, फुरसतगंज, भागलपूर या ठिकाणी दृश्यता 25 मीटरपर्यंत खाली आली होती. तर हिसार, करनाल, पालम, मेरठ, लखनौ, बहराईच आणि पाटणा याठिकाणी दृश्यता 50 मीटरपर्यंत कमी झाली होती. धुक्यामुळे रस्ते आणि हवाई वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button