KL Rahul vs Ishan Kishan : रोहित शर्मा केएल राहुलसाठी देणार इशान किशनचा बळी? | पुढारी

KL Rahul vs Ishan Kishan : रोहित शर्मा केएल राहुलसाठी देणार इशान किशनचा बळी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : KL Rahul vs Ishan Kishan : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (दि. 10) खेळवला जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू पुनरागमन करत आहेत. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंना संघाच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार की नाही, हा चिंतेचा विषय बनला आहे.

वन डे मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांसारखे खेळाडू पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये दिसणार आहेत. संघाचा कर्णधार रोहित युवा उत्साही आणि अनुभवी खेळाडूंना एकत्रीत घेऊन खेळेल, अशी आशा आहे. पण या मालिकेतील पहिल्या सामन्यात प्लेइंग 11 निवडणे कर्णधारासाठी सर्वात कठीण काम असेल. रोहितसमोर सर्वात मोठी अडचण असेल ती केएल राहुल किंवा इशान किशन यांच्यापैकी एकाची निवड करण्याची.

राहुल किंवा ईशान (KL Rahul vs Ishan Kishan)

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी राहुल आणि इशान या दोन यष्टीरक्षक फलंदाजांचा संघात समावेश करण्यात आला आहे. गेल्या मालिकेत राहुल टीम इंडियाचा उपकर्णधार होता, त्यामुळे खराब कामगिरी असूनही त्याला टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मधून वगळण्यात आले नाही. पण श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेत हार्दिक पंड्याला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

दुसरीकडे, बांगलादेशविरुद्ध रोहितच्या दुखापतीनंतर प्लेइंग 11 मध्ये सामील झालेल्या इशान किशनने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. बांगलादेशविरुद्ध सर्वात वेगवान द्विशतक झळकावल्यानंतर त्याने टीम इंडियातीन स्थानावर आपला दावा केला आहे. अशा परिस्थितीत इशानसाठी राहुलला कट्ट्यावर बसवले जाऊ शकते. राहुलही बराच काळ फ्लॉप ठरला आहे. काही मोजके सामने सोडल्यास तो इतर सामन्यांमध्ये त्याची बॅट थंड पडली आहे. संघ व्यवस्थापनाने वारंवार संधी देऊनही राहुल धावा करू शकला नाही. अशा परिस्थितीत त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली तर त्याला स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. (KL Rahul vs Ishan Kishan)

आकडेवारीत इशानचा वरचष्मा

इशान किशनने पदार्पण केल्यापासून एक वेगळी छाप सोडली आहे. स्फोटक फलंदाजीसाठी तो जगभर प्रसिद्ध आहे. इशानने भारतासाठी फक्त 10 वन डे सामन्यांमध्ये 111.97 च्या स्ट्राइक रेटने आणि 53 च्या सरासरीने 477 धावा केल्या आहेत. अलीकडेच त्याने बांगलादेशविरुद्धच्या वन डे सामन्यात 210 धावांची इनिंग खेळली होती. दुसरीकडे राहुलचे आकडे दिवसेंदिवस खराब होत आहेत. तो गेल्या 10 वन डे सामन्यांत 27.88 च्या सरासरीने आणि 87.86 च्या स्ट्राइक रेटने केवळ 251 धावा जमा करू शकला आहे. यादरम्यान त्याने केवळ दोन अर्धशतके झळकावली आहेत. अशा परिस्थितीत आकडेवारीचा विचार केल्यास कर्णधार रोहित शर्माने इशान किशनला वगळले तर तो त्याच्यावर अन्याय होईल, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (KL Rahul vs Ishan Kishan)

Back to top button