Stock Market Updates | शेअर बाजारात तेजीचा ‘वारू’, गुंतवणूकदार ३.५ लाख कोटींनी श्रीमंत, ‘हे’ ६ घटक ठरले महत्त्वाचे! | पुढारी

Stock Market Updates | शेअर बाजारात तेजीचा 'वारू', गुंतवणूकदार ३.५ लाख कोटींनी श्रीमंत, 'हे' ६ घटक ठरले महत्त्वाचे!

Stock Market Updates : शेअर बाजारातील मागील तीन सत्रांतील घसरणीला आज (दि.९) ब्रेक लागला. जागतिक सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी आली. सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ६०० अंकांनी वाढून ६०,५०१ वर तर निफ्टीने १८० अंकांनी वाढून १८ हजारांवर व्यवहार केला. त्यानंतर दुपारी १२च्या सुमारास सेन्सेक्स सुमारे ९८० अंकांनी उसळी घेत ६०,८७९ वर पोहोचला होता. तर निफ्टी २८० अंकांनी वाढून १८,१४० वर गेला. सेन्सेक्सची ही वाढ १.५९ टक्के तर निफ्टीची वाढ १.५२ टक्के एवढी आहे. त्यानंतर सेन्सेक्स ८४६ अंकांच्या वाढीसह ६०,७४७ वर बंद झाला. तर निफ्टी २४१ अंकांच्या वाढीसह १८,१०१ वर स्थिरावला. या तेजीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूदारांना ३.४५ लाख कोटींचा फायदा झाला असून, (Investors richer by Rs 3.४5 lakh crore) बाजार भांडवल (market capitalisation) २८३.२ लाख कोटींवर पोहोचले. रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो यांचे शेअर्स आघाडीवर राहिले. TCS, विप्रो प्रत्येकी ३ टक्क्यांनी वाढले.

खरेदीचा जोर वाढला

आज (दि.९) सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी आयटी २.४५ टक्क्यांनी आणि निफ्टी ऑइल अँड गॅस १.२३ टक्क्यांने वाढला. बँका, वित्तीय, ऑटो, मेटल, फार्मा, हेल्थकेअर आणि एफएमसीजी शेअर्स तेजीत राहिले. निफ्टी मिडकॅप ५० हा ०.९८ टक्के आणि स्मॉलकॅप ५० हा १.०२ टक्क्यांने वधारला.

‘हे’ शेअर्स आघाडीवर

टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, टाटा स्टील यांचे शेअर्स आघाडीवर राहिले. विप्रो, भारतीय एअरटेल, टीसीएस, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट यांनीदेखील हिरव्या रंगात व्यवहार केला. दरम्यान, टायटनचे शेअर्स सोमवारी २.६ टक्क्यांनी घसरून २४७०.७० रुपयांवर आले. टायटनचे तिमाही निकाल अपेक्षा पूर्ण करणारे नसल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीने त्यांच्या व्यवसायात १२ टक्के वाढ नोंदवली आहे.

PSU bank शेअर्संची चांगली कामगिरी

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्संनी (PSU bank stocks) आज चांगली कामगिरी केली. कॅनरा बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक, आयडीबीआय बँक यांचे शेअर्स सर्वांधिक वाढले. ऑटो शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, एस्कॉर्ट्स कुबोटा लि., अशोक लेलँड, हिरो मोटोकॉर्प हे आघाडीवर राहिले.

कमी व्याजदरवाढीची शक्यता आणि चीनमधून आर्थिक देवाणघेवाण

अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीची गती कमी करेल आणि चीनमधून आर्थिक देवाणघेवाण सुरु होईल या दोन शक्यतांनी आज आशियाई बाजारात तेजीचे वातावरण राहिले. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूदारांच्या भावना उंचावल्या. (Stock Market Today) अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक वधारले. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह माफक अशी २५ बेसिस पॉइंट्सने व्याजदरात वाढ करेल, अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे. गेल्या वर्षात केलेल्या आक्रमक दरवाढीमुळे अर्थव्यवस्था संथ गतीने मार्गक्रमण करत आहे. सोमवारी युरोपियन शेअर्सही वाढले. नवीन वर्षाची उत्साही सुरुवात दुसऱ्या आठवड्यात दिसून आली. येथेही फेडरल रिझर्व्हची दरवाढीची भूमिका आणि चीनकडून खुल्या करण्यात आलेल्या सीमा हे दोन घटक कारणीभूत ठरले.

जागतिक बाजारात उत्साही मूड

अमेरिकेतील शेअर बाजारातील तेजीचा मागोवा घेत आशियाई बाजारांनीदेखील आज तेजीत व्यवहार केला. चीनने तीन वर्षांपासून बंद असलेल्या सर्व सीमा आता खुल्या केल्या आहेत. यामुळे आशियाई बाजारांत आशादायी चित्र निर्माण झाले आहे. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक २ टक्के वाढून पाच महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. तर दक्षिण कोरियातील शेअर्स २.२ टक्क्यांनी वाढला. हाँगकाँगचे शेअर्स १.४ टक्के वाढून वर गेला. तर निक्की निर्देशांक आज सुट्टीमुळे बंद होता. (Stock Market Updates)

डॉलर कमजोर, रुपयाला चालना

सोमवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ०.४८ टक्क्यांनी वाढून ८२.३३ वर पोहोचला. तर सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर इंडेक्स घसरला असून ते १०४ च्या खाली आला आहे.

अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा

केंद्रीय अर्थसंकल्प अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून गुंतवणूकदारांना मोठ्या आशा आहेत. यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा गुंतवणूकदारांसाठी अनुकूल असावा, अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे. करात सूट मिळेल अशी अपेक्षाही गुंतवणूकदारांना आहे.

TCS चे शेअर्स ३ टक्क्यांनी वाढले

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे शेअर्स आजच्या व्यवहारात ३ टक्क्यांनी वाढले. यामुळे या IT कंपनीच्या डिसेंबर तिमाही निकालांपूर्वी बाजार भांडवल (एम-कॅप) १२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. TCS चा शेअर ३.०१ टक्क्यांनी वाढून ३,३०८.९५ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. आज आयटी निर्देशांक २.५३ टक्क्यांनी वाढला.

कच्च्या तेलाचे दर

जागतिक आर्थिक मंदी आणि चीनमधील कोविड-१९ ची वाढती प्रकरणे यामुळे गुंतवणूकदार इंधनाच्या मागणीमुळे चिंतेत आहे. ब्रेंट क्रूड फ्यूचर्समध्ये आज १.२ टक्के वाढ झाली. तरीही कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ८० डालरच्या खालीच आहेत. गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली होती.

हे ही वाचा :

Back to top button