काही देशांना श्रेष्ठ मानणाऱ्या जागतिक श्रेणीवर भारताचा विश्वास नाही : राजनाथ सिंह | पुढारी

काही देशांना श्रेष्ठ मानणाऱ्या जागतिक श्रेणीवर भारताचा विश्वास नाही : राजनाथ सिंह

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेत ‘मेक फॉर दि वर्ल्ड’ चा देखील समावेश आहे. कोणत्याही देशासोबत भारत जेव्हा भागीदारी करतो तेव्हा ही भागीदारी समानता आणि सन्मानाच्या आधारावर असते. काही देशांना श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या जागतिक श्रेणीवर भारताचा विश्वास नाही. असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (दि.९ ) सांगितले. ‘एरो इंडिया’ ची पूर्वतयारी म्हणून विविध देशांच्या राजदूतांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

संरक्षण मंत्री सिंह म्हणाले की, सध्या जी -२० देशांचे अध्यक्षपद भारताकडे आहे. एकूण जागतिक व्यापाराच्या ७५ टक्के, जीडीपीच्या ८५ टक्के तर लोकसंख्येच्या ७५ टक्के प्रतिनिधीत्व जी – २० संघटना करते. विविध मुद्द्यावर सर्वसहमती बनविणे, हे जी २० संघटनेचे उद्दिष्ट आहे. जास्त सुरक्षित, समृद्ध, टिकाऊ आणि न्यायपूर्ण जगाचा अजेंडा पुढे नेण्यास या संघटनेने प्राधान्य दिले आहे. भारताची लोकशाही, विकास आणि विविधतेचे प्रदर्शन जगासमोर करण्याची संधी म्हणून आम्ही जी २० अध्यक्षपदाकडे पाहत आहोत. मेक इन इंडियाची मोहिम म्हणजे जगापासून वेगळे राहण्याची अथवा केवळ देशासाठी काहीतरी करण्याची नाही, तर ‘मेक फॉर दि वर्ल्ड’ हाही या मोहिमेचा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान बंगळुरू येथे एरो इंडिया २०२३ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहितीही सिंह यांनी या वेळी दिली.

हेही वाचा :

Back to top button