राज्यात येत्या काळात राजकीय घडामोडी वेगळ्या वळणावर : दीपक केसरकर | पुढारी

राज्यात येत्या काळात राजकीय घडामोडी वेगळ्या वळणावर : दीपक केसरकर

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा :  शिवसेनेची वंचित बहुजन आघाडीशी होणारी आघाडी म्हणजे महाविकास आघाडीच्या गरजेपोटी असून त्यांचा कमी झालेला लोकाधार आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेने हिंदुत्वाचा मार्ग सोडला याचा परिणाम आहे. राज्यात येत्या काळात राजकीय घडामोडी वेगळ्या वळणावर गेलेल्या असतील, असे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे बोलताना केले, तसेच धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सावंतवाडी येथे श्रीधर आपार्टमेंट संपर्क कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. ना. केसरकर म्हणाले, शिवसेनेचे स्वतःचे अस्तित्व संपलेले आहे. मात्र बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ आहे. उद्धव बाळासाहेब शिवसेनेचा हिंदुत्वाचा विचार बदलला आहे. मराठी माणूस हा त्यांचा आत्मा होता, परंतु तोच आता परागंदा झाला आहे. मराठी भाषेकडेही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. एक वेळ काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा वंचित आघाडीशी मिळती जुळती आहे. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची विचारधारा वंचितशी कशी काय मिळतीजुळती होईल. एकीकडे सर्व माणसे त्यांना सोडून जात आहेत. सहानुभूतीवर पक्ष फार काळ टिकू शकत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Back to top button