दिल्ली कोर्टात अचानक गोळीबार; कुख्यात गुंडासहीत चौघांचा मृत्यू  | पुढारी

दिल्ली कोर्टात अचानक गोळीबार; कुख्यात गुंडासहीत चौघांचा मृत्यू 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाच्या राजधानीतील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना शुक्रवारी घडली. उच्च सुरक्षाव्यवस्थेने सुसज्जित रोहिणी न्यायालय टोळीयुद्धातून झालेल्या गोळीबाराने हादरले. या घटनेत एका कुख्यात गुंडाची हत्या झाली. सुरक्षारक्षकांना त्याच्या मारेकऱ्यांचा खात्मा करण्यात यश आले.

भर दुपारी न्यायालयात फिल्मी स्टाईल रंगलेल्या या थरार नाट्यानंतर मात्र पोलीस सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर सवाल उपस्थित केले जात आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला कुख्यात गुंड जितेंद्र मान उर्फ गोगीची हत्या करण्यासाठी मारेकरी वकिलांचा पेहराव करीत न्यायालय परिसरात घुसले होते. टिल्लू ताजपुरिया टोळीने वकिलांचा पेहराव करून गोगी वर हल्ला चढवल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिलेल्या माहितीनूसार, रोहिणी न्यायालयात सुनावणी साठी घेऊन जात असताना दोन गुंडांनी गोगीवर गोळीबार केला. पोलिसांनी गोळीबाराला प्रत्यूत्तर देत दोन्ही मारेकऱ्यांचा खात्मा केला. न्यायालयातील चेंबर क्रमांक २०६ मध्ये ही घटना घडली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे न्यायालय परिसरात धावपळ उडाली. गोळीबार झाला तेव्हा न्यायालयात मोठ्या संख्येत लोक हजर होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हल्लेखोरांनी जितेंद्र वर गोळीबार केला. स्पेशल सेलच्या टीमने जितेंद्र कोर्ट रूममध्ये नेले होते. तिथे हा थरारक प्रसंग घडला. जे हल्लेखोर ठार झाले आहेत त्यातील एकाचे नाव राहुल आहे. त्याच्यावर ५० हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. तर, दुसरा मृतक देखील वॉंटेडच होता.

कोण होता जितेंद्र गोगी?

गुंड जितेंद्रला दोन वर्षांपूर्वी गुरुग्राममधून स्पेशल सेलने अटक केली होती. जितेंद्र गोगीने गुन्हेगारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवली होती. गोगीच्या नेटवर्कमध्ये ५० हून अधिक गुन्हेगार आहेत. विशेष म्हणजे जितेंद्र गोगीला २०२० मध्ये गुरुग्राम येथून अटक करण्यात आली होती. गोगीसह कुलदीप फज्जाच्याही मुसक्या आवळल्या होत्या. २५ मार्च रोजी कुलदीप फज्जा कोठडीतून पळून गेला. फज्जा जीटीबी रुग्णालयातून पळून गेला होता त्यानंतर त्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता.

पहा व्हिडीओ : पुराने ओढवलेल्या भयाण परिस्थितीतून जातंय महाड

Back to top button