दुर्गम भागात प्रसार भारती देणार ८ लाख मोफत डिश, सेट टॉप बॉक्स

दुर्गम भागात प्रसार भारती देणार ८ लाख मोफत डिश, सेट टॉप बॉक्स

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : प्रसार भारतीच्या म्हणजेच आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अडीच हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत देशातील आदिवासी, दुर्गम भागातील, नक्षली प्रभाव असलेल्या व सीमाभागातील नागरिकांसाठी 8 लाख सॅटेलाईट डिश व सेट टॉप बॉक्स मोफत देण्याचा समावेश आहे. यामुळे या भागातील नागरिकांना सरकारच्या योजना तसेच ताजी माहिती पोहोचवता येणार आहे.

प्रसार भारती, देशातील सार्वजनिक प्रसारक म्हणून दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून देशातील विशेषत: दुर्गम भागातील लोकांसाठी माहिती, शिक्षण, मनोरंजन आणि व्यस्ततेचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. प्रसार भारतीने कोरोना महामारीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावली.

याच प्रसार भारतीच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 2 हजार 539 कोटी रुपयांचा प्रस्ताव माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिला होता. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मंजूर केला आहे. सेवेचा दर्जा सुधारणे, तांत्रिक सुधारणा, डिजिटल अपग्रेडेशन व एचडी प्रसारण यासाठी प्लॅटफॉर्मची क्षमता वाढवणे आदी कामे या प्रस्तावात समाविष्ट आहेत.

याशिवाय आणखी एक महत्त्वाचे काम या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. ते म्हणजे अधिकृत माहितीपासून दूर असलेले देशातील घटक, ज्यात ग्रामीण भाग, आदिवासी भाग, नक्षल्यांचा प्रभाव असलेला भाग व आंतरराष्ट्रीय सीमेनजीकचा भाग येतो, या भागांत मोफत सॅटेलाईट डिश व सेट टॉप बॉक्स वितरित करण्यात येणार आहेत.

सध्या, दूरदर्शन 28 प्रादेशिक वाहिन्यांसह 36 टी.व्ही. चॅनेल चालवते आणि आकाशवाणी 500 हून अधिक प्रसारण केंद्रे चालवते. या योजनेत दुर्गम, आदिवासी आणि सीमावर्ती भागात राहणार्‍या 8 लाखांहून अधिक लोकांना मोफत डिशचे वितरण केले जाईल.

सार्वजनिक प्रसारणाची व्याप्ती वाढवण्याबरोबरच, प्रसारणाच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि वाढ करण्याच्या प्रकल्पामध्ये प्रसारण उपकरणांच्या पुरवठा आणि स्थापनेशी संबंधित उत्पादन आणि सेवांद्वारे अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याची क्षमतादेखील आहे. डीडी फ्री डिशचा विस्तार करण्याच्या प्रकल्पामुळे डीडी फ्री डिश डीटीएच बॉक्सेसच्या निर्मितीमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news