‘फक्त पोकळ विधाने करु नका’; सीमाप्रश्नावरुन मुख्यमंत्री बोम्मईंना कर्नाटक काँग्रेसकडून घरचा आहेर | पुढारी

‘फक्त पोकळ विधाने करु नका’; सीमाप्रश्नावरुन मुख्यमंत्री बोम्मईंना कर्नाटक काँग्रेसकडून घरचा आहेर

बंगळुरु; पुढारी ऑनलाईन : काँग्रेसच्या कर्नाटकचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी बुधवारी (दि.२८) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना सांगितले की, त्यांनी महाराष्ट्रासोबतच्या सीमाप्रश्नावर सर्वपक्षीय शिष्टमंडळासह तातडीने दिल्लीला जावे. यासोबतच बोम्मई यांनी याप्रकरणी केवळ पोकळ विधाने केल्याचा आरोपही त्यांनी केला. कर्नाटक आपली एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असे बोम्मई म्हणाले होते. या विधानावर शिवकुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या प्रकरणी जाहीर आश्वासन देण्याची मागणी केली.
डीके शिवकुमार यांनी ट्विट करत लिहले आहे की, “मुख्यमंत्री केवळ पोकळ विधाने करत आहेत यात आश्चर्य वाटत नाही. कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असे त्यांना खरेच वाटत असेल, तर त्यांनी तातडीने सर्वपक्षीय शिष्टमंडळासह दिल्लीला जावे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी याबाबत जाहीर आश्वासन द्यावे, अशी मागणी करावी.

सीमाप्रश्नावर महाराष्ट्र विधिमंडळात मंजूर झालेला ठराव ‘बेजबाबदार आणि संघराज्य रचनेच्या विरोधात’ असल्याचे सांगून बोम्मई यांनी मंगळवारी सांगितले होते की, राज्याची एक इंचही जमीन सोडली जाणार नाही. कर्नाटकातील 865 मराठी भाषिक गावांचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी “कायदेशीर पावले उचलण्याचा” ठराव महाराष्ट्र विधानसभेने मंगळवारी मंजूर केला होता.

गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही राज्यांमधील सीमाप्रश्न पुन्हा चिघळला असून दोन्ही राज्यांचे नेते यावर सातत्याने वक्तव्ये करत आहेत. बेळगावमधील तणावपूर्ण परिस्थिती पाहता पोलिसांनी अनेक कन्नड आणि मराठी समर्थक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

दोन राज्यांमधील हा सीमावाद 1957 मध्ये भाषेच्या आधारावर त्यांच्या पुनर्रचनेपासूनचा आहे. पूर्वीच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग असलेल्या बेळगाव आपला असल्याचा महाराष्ट्राचा दावा आहे, कारण तेथे मराठी भाषिकांची मोठी लोकसंख्या आहे. सध्या कर्नाटकचा भाग असलेल्या 865 मराठी भाषिक गावावरही महाराष्ट्र आपला हक्क सांगत आहे.


अधिक वाचा :

Back to top button