लोकसभेची निवडणूक लढविणार नाही : सुशीलकुमार शिंदे | पुढारी

लोकसभेची निवडणूक लढविणार नाही : सुशीलकुमार शिंदे

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : राजकारणात चढ-उतार येतच असतात. काँग्रेस कधीही संपणार नाही. कोणी काहीही म्हटले तरी मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही. मात्र, सोलापूर मतदारसंघातून मी निवडणूक लढणार नाही, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षच्या स्थापना दिनानिमित्त सोलापूर शहरातील काँग्रेस भवनामध्ये ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी शिंदे म्‍हणाले, “महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मी मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन तोडगा काढण्यासाठी दावा केला होता. त्याबाबत निर्णय झाला नाही. आताही पुन्हा याच वादातून बोम्मई हे मनात येईल, तशी विधाने करीत आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने स्पष्ट भूमिका घ्यायला हवी. मात्र, मुख्यमंत्री शिंदे काही बोलत नाहीत. याचा अर्थ त्यांना भाजपच्या साथीने ओढून ताणून उर्वरित कार्यकाळ पूर्ण करायचा आहे.”

भाजपने सर्व प्रकारचे प्रयत्न करून सध्या सत्ताकेंद्र ताब्यात घेतली आहेत. काँग्रेसचे देश, राज्याच्या विकासात मोठे योगदान आहे, हे जनता विसरली नाही. काँग्रेस कधीच संपणार नाही. ती पुन्हा उभारी घेईल; पण यापुढे मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही. मात्र पक्षात सक्रिय राहणार आहे, असेही शिंदे यावेळी म्हणले,  या वेळी आ. प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button