आसाममधील मतदारसंघ पुनर्रचनेच्या कामास सुरुवात | पुढारी

आसाममधील मतदारसंघ पुनर्रचनेच्या कामास सुरुवात

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आसाममधील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचना कामास सुरुवात करण्यात आली आहे. २००१ सालच्या लोकसंख्येला आधारभूत मानून मतदारसंघ पुनर्रचना केली जात आहे. दुसरीकडे २०११ ऐवजी २००१ च्या लोकसंख्येचे प्रमाण आधारभूत मानून मतदारसंघ पुनर्रचना का केली जात आहे? असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे.

आसाममध्ये याआधी १९७६ साली मतदारसंघ पुनर्रचना करण्यात आली होती. त्यावेळी १९७१ सालची जनगणना आधारभूत मानून जनगणना झाली होती. घटनेच्या कलम १७० अन्वये मतदारसंघ पुनर्रचना करणे गरजेचे असल्याने पुनर्रचनेस सुरुवात करण्यात आली असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. पुनर्रचना केली जात असताना घटनेच्या कलम ३३० आणि ३३२ नुसार अनुसूचित जाती तसेच अनु. जमातींसाठी आवश्यक त्या जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत.

१९७१ साली आसामची लोकसंख्या १.४६ कोटी इतकी होती. २००१ साली ती वाढून २.६६ कोटी इतकी झाली. तर २०११ च्या जनगणनेनुसार आसामची लोकसंख्या ३.१२ कोटी इतकी होती. जनगणनेचे काम पूर्ण होईपर्यंत राज्यात नवीन कोणतेही प्रशासकीय विभाग तयार केले जाउ नयेत, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाने याआधी जम्मू-काश्मीरमधील मतदारसंघांची पुनर्रचना केली होती.

हेही वाचा : 

Back to top button