राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे काश्मीरमधील शांततेत बाधा येण्याची शक्यता : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर | पुढारी

राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे काश्मीरमधील शांततेत बाधा येण्याची शक्यता : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पुढील काही दिवसांत काश्मीरमध्ये जाणार आहे. या यात्रेमुळे काश्मीर खोऱ्यातील शांतता बाधित होऊ शकते. मोदी सरकारच्या कार्यकाळात काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती झपाट्याने सुधारलेली आहे. ही स्थिती खराब करण्याचा काँग्रेसचा विचार आहे का, असा सवाल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. आज
( दि. २८) दिल्ली येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

या वेळी अनुराग ठाकूर म्हणाले, गेल्या एक वर्षाच्या कालावधीत जम्मू-काश्मीरला १.६ कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे. पर्यटकांच्या काश्मीर भेटीचा हा एक प्रकारचा विक्रम आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक काश्मीरला जात आहेत. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सुधारत असल्याचे हे निदर्शक आहे. खोऱ्यातील दगडफेकीच्या घटना थांबलेल्या आहेत.”

मोदी सरकारच्या काळात काश्मीरमध्ये कोणीही तिरंगा फडकवू शकतो. मोदी सरकारने कलम ३५ ए तसेच कलम ३७० संपुष्टात आणले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सप्टेंबर महिन्यात कन्याकुमारीहून सुरुवात झाली होती. पुढील महिन्यात काश्मीरमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. भाजपचे तत्कालीन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी तसेच नरेंद्र मोदी यांनी १९९२ साली काश्मीरमध्ये एकता यात्रा काढून लाल चौकात तिरंगा फडकाविला होता, त्याचीही अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसला आठवण करुन दिली.

काश्मीर खोऱ्यात नव्वदच्या दशकात दहशतवाद शिगेला पोहोचला होता आणि एकता यात्रेला विरोध होत होता. अशावेळी ही यात्रा काढण्यात आली होती. तिरंगा यात्रेला विरोध करणाऱ्या काँग्रेस सरकारने तेव्हा भाजपच्या तत्कालीन नेत्या सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांना अटकदेखील केली होती, असेही ठाकूर म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button