Gold rate : सोने दरवाढीचा ४७ वर्षांतील उच्चांक; तोळ्याला ५६,५०० रुपये | पुढारी

Gold rate : सोने दरवाढीचा ४७ वर्षांतील उच्चांक; तोळ्याला ५६,५०० रुपये

नवी मुंबई : राजेंद्र पाटील, गुरुवारी सोन्याने गेल्या ४७ वर्षांतील उच्चांकी दर गाठले. १९७५ साली ५४० रुपये तोळे असलेले सोने २२ डिसेंबर २०२२ रोजी थेट ५६ हजार ५०० वर पोहोचले. (Gold rate )


पौष महिन्यांत लग्नसराई नसल्याने वधू- वर मंडळीनी आधीच सोन्याची खरेदी केल्याने त्यांना हा भुर्दंड बसला नाही. मात्र, हा महिना सरल्यानंतर सोन्याचे भाव असेच चढते राहिल्यास लग्नाळू कुटुंबांना जादा पदरमोड करावी लागणार आहे. सोन्याच्या उच्चांकी दराची कारणे सांगताना जळगावच्या बाफना ज्वेलर्सचे मालक सुशील बाफना यांनी पुढारीला सांगितले की, अमेरिकेत एफडीची व्याज दरवाढ होणार नाही, हे जाहीर झाल्याने त्याचा फटका म्हणून ही सोने दरवाढ झाली. शिवाय अमेरिकेसह पंधरा देशांमध्ये पुन्हा सुरू झालेली कोरोनाची महामारी, रशिया-युक्रेनच्या युध्दामुळेही सोने तेजीत आले. साधारण २०१४ पासून सोन्यात भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा कल वाढल्याने मागणी वाढली. त्याचाही दरवाढीत परिणाम दिसतो.

Gold rate : दुहेरी फटका

एकीकडे सोन्याची होत असलेली दरवाढ, त्यात जीएसटी आणि घडणावळ यामुळे सोन्याचे दर प्रचंड वाढले आहेत. सोन्याची घडणावळ ही ११ ते १५ टक्क्यांपर्यंत आहे. प्रतिग्रॅम ६५५ रुपये घडणावळ पडते. सोन्याच्या हारासाठी १३ टक्के, चेन ११ टक्के, अंगठी १३ टक्के, फॅन्सी वस्तूंसाठी ११ ते १५.५ टक्के घडणावळ घेतली जाते. म्हणजे आधीच सोने महाग त्यात जीएसटी आणि घडणावळ मिळून गुरुवारी सोन्याने ५६ हजार ५०० रुपयांपर्यंत मजल मारली.

हेही वाचा

 

Back to top button