चक्क ताजमहलला घरफाळ्याची नोटीस; फाळा न भरल्यास होणार जप्ती! | पुढारी

चक्क ताजमहलला घरफाळ्याची नोटीस; फाळा न भरल्यास होणार जप्ती!

आग्रा महापालिकेची कारवाई

आग्रा, पुढारी ऑनलाईन डेस्क – आग्रा महापालिकेने ताजमहलला घरफाळा आणि थकित पाणी बिलाची नोटीस पाठवली आहे. पहिल्यांदाच अशी नोटीस आली असल्याने पुरातत्त्व विभाग बुचकळ्यात पडले आहे. ताजमहलची १.९ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकित आहे. तर घरफाळा १.५ लाख रुपये आहे.

घरफाळा आणि पाणीपट्टी वेळेत भरला नाही तर जप्तीची कारवाई केली जाईल, असे नोटिसीत म्हटले आहे.

पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक राज कुमार पटेल म्हणाले, “ऐतिहासिक वास्तूंना घरफाळा लागू होत नाही. तसेच पिण्याच्या पाण्याचा कोणताही वापर ताजमहलमध्ये केला जात नाही. पाण्याचा वापर हा फक्त बगीच्यासाठी आहे. आता आलेली नोटीस ही नजरचुकीने आली असल्याचे दिसते. अशी नोटीस आम्हाला पहिल्यांदाच आली आहे.”

महापालिका आयुक्त निखिल फुंडे यांनी या नोटिसीबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, “महापालिकने जीआयएस तंत्रावर अधारीत घरफाळा मोजणी सुरू केली आहे. त्यातून धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तूंना आणि सरकारी कार्यालयांना नोटिसा गेल्या असाव्यात. संबंधित विभागांकडून खुलासा आल्यानंतर अंतिम कारवाई होईल.”

उपायुक्त सरिता सिंग म्हणाल्या, “जीआयएसच्या मदतीने घरफाळा नोटीस पाठवण्याचे काम खासगी कंपनीला दिले आहे. ताजमहलला पाठवलेल्या नोटीसबद्दल तपास केला जाईल.”

हेही वाचा

Back to top button