

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरात मंदीचे सावट असल्याने मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरु आहे. असे असताना भारतात मात्र नोकऱ्यांची संधी निर्माण होत आहेत. भारतीय 'स्टार्ट अप्स'नी (start-ups) २०२२ मध्ये २ लाख ३० हजार नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. अशी माहिती StrideOne या वित्तीय सेवा प्लॅटफॉर्मने एका रिपोर्टमधून दिल्याचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे. २०१७-२२ दरम्यान स्टार्ट-अप्सद्वारे निर्माण झालेल्या एकूण नोकऱ्यांच्या संख्येत ७८ टक्क्यांने वार्षिक वाढ झाली आहे. तर २०२२-२७ दरम्यान नोकऱ्यांच्या संख्येतील वार्षिक वाढ २४ टक्के राहण्याचा अंदाज या रिपोर्टमधून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने केंद्राने सरकारने उचललेल्या पावलांमुळे २०२५ पर्यंत नोकऱ्यांमध्ये ७० पटीने वाढ होईल, असेही भाकित यातून केले आहे.
भारतीय स्टार्ट-अप इकोसिस्टम ही अमेरिका आणि चीननंतरची जगातील तिसरी मोठी व्यवस्था आहे. भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडे ७ लाख ७० हजार स्टार्ट-अपची नोंदणी आहेत. १०८ युनिकॉर्न्सचा समावेश असलेल्या स्टार्ट-अपचे एकत्रित मूल्य ४०० अब्ज डॉलर पेक्षा अधिक आहे.
StrideOne चे संस्थापक इशप्रीत सिंह गांधी यांनी म्हटले आहे की, इकोसिस्टमच्या वाढीमुळे उत्पादनाचे सर्व घटक (scalability), पर्यायी निधी व्यवस्था आणि जागतिक बाजारपेठेत विस्तार यासारख्या विविध पैलूंमध्ये अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच लाखो नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता वाढली आहे.
"start-ups च्या या वाढीमुळे भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप इकोसिस्टम बनला आहे. तसेच याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम झाला आहे. यामध्ये भारताच्या जीडीपीमध्ये अंदाजे ४-५ टक्के योगदान देण्याची क्षमता आहे," असेही त्यांनी म्हटले आहे.
ॲमेझॉन, मेटा, ट्विटर आणि इतर अनेक दिग्गज टेक कंपन्या आर्थिक परिस्थितीचे कारण सांगून हजारो कर्मचार्यांना काढून टाकत आहे. अशा परिस्थितीत मात्र भारतीय स्टार्ट अप्सनी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.
हे ही वाचा :