

पुढारी ऑनलाईन : लष्करातील 246 महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदी बढती देण्यासाठी विशेष निवड मंडळाला सांगितले जाणार आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या पीठासमोर सुरू असलेल्या एका खटल्यात लष्कराने ही माहिती दिली आहे. लष्करातील महिला अधिकाऱ्यांना बढती देण्यासंदर्भात हा खटला सुरू आहे. लष्करातील ३४ महिला अधिकाऱ्यांनी हा खटला दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बबिता पुनिया यांच्या खटल्यात महिला अधिकाऱ्यांना बढती देण्याबद्दल निवाडा देऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही, असे या महिला अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
लष्कराच्या वतीने आर. बालसुब्रमणियन यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, "246 महिला अधिकाऱ्यांना बढती देण्याचा निर्णय ९ जानेवारी २०२३ला अपेक्षित आहे."
बढती संदर्भात मंडळ जो निकाल देईल तो न्यायालयासमोर सादर करावा, पुढील सुनावणी ३० जानेवारी २०२३ला असेल, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले आहेत.
महिला अधिकाऱ्यांच्यावतीने अॅड. राकेश कुमार बाजू मांडत आहेत. वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांना डावलून कनिष्ठ पुरुष अधिकाऱ्यांना कर्नल पदावर बढती दिली जात आहे, असे त्यांनी सांगितले. पुरुष अधिकाऱ्यांच्या बरोबरीने महिला अधिकाऱ्यांना बढती देण्यासाठी तातडीने निवड मंडळ गठित करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा