तवांगमधील चिनी घुसखोरीच्या मुद्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ | पुढारी

तवांगमधील चिनी घुसखोरीच्या मुद्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे चिनी सैनिकांनी केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नाचे मंगळवारी संसदेच्या उभय सदनात तीव्र पडसाद उमटले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या मुद्यावर उभय सदनात निवेदन दिले. तथापि या निवेदनानंतरही विरोधी पक्षांचे समाधान झाले नसल्याने त्यांनी गोंधळ सुरुच ठेवला. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घुसखोरीच्या मुद्यावर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान तसेच लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांशी चर्चा केली.

तवांगमध्ये भारतीय चौकीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय सैनिकांनी पिटाळून लावले होते. यावेळी झालेल्या झटापटीत दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले होते. ९ डिसेंबर रोजी झालेल्या या घटनेची माहिती उशीराने देण्यात आल्याचा आक्षेप घेत विरोधी पक्षांनी संसदेत सरकारवर हल्लाबोल केला. सरकारच्या कमजोर धोरणामुळेच चीनची आक्रस्ताळेपणा वाढला असून सरकारने यावर चर्चा घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे सदस्य अधिर रंजन चौधरी यांच्यासह इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. सदर मुद्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन दिले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. तरीही विरोधी पक्षांचा गदारोळ थांबत नसल्याने गोंधळामुळे अध्यक्षांना कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.

संरक्षण मंत्री सिंह यांनी दुपारच्या कामकाजाला सुरुवात होताच तवांगच्या घटनेवर उभय सदनात निवेदन दिले. सीमेवर असलेली ‘जैसे थे‘ स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न चीनने केला. पण भारतीय कमांडर्सनी वेळीच त्याला विरोध केल्याने चीनचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. यावेळी झालेल्या झटापटीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. झटापटीत एकही भारतीय सैनिक मरण पावला नाही. अथवा कोणालाही गंभीर जखम झाली नाही. झटापटीनंतर चीनचे सैनिक त्यांच्या मूळ जागेवर परत गेले. नंतर राजनैतिक माध्यमातून घुसखोरीचा मुद्दा चीनसमोर उपस्थित करण्यात आला, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. आपल्या सैनिकांनी सीमेचे रक्षण केलेले आहे आणि घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे, असेही ते म्हणाले. सिंह यांच्या उत्तरावर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचे समाधान झाले नसल्याने त्यांनी सभात्याग केला.

अमित शहा यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे तवांगच्या मुद्यावर संसदेत निवेदन देणार आहेत, हे माहित असूनही विरोधकांनी प्रश्नोत्तराचा तास चालवू दिला नाही, याचा आपण निषेध करतो, असे गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासातला पाचव्या क्रमांकाचा प्रश्न राजीव गांधी फाउंडेशनचा एफसीआरए परवाना रद्द करण्याबाबतचा होता. या प्रश्नाला मी उत्तर देणार होतो. अशा स्थितीत काँग्रेसची मनस्थिती आपण समजू शकता. उत्तर देण्याची संधी मिळाली असती तर राजीव गांधी फाउंडेशनला २००५ ते २००७ या कालावधीत चीनकडून १.३५ कोटी रुपये मिळाले होते, ही माहिती सदनासमोर देता आली असती, असा टोला शहा यांनी लगावला.

एफसीआरए कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना काही महिन्यांपूर्वीच रद्द करण्यात आलेला आहे, असे सांगतानाच चीनने भारताच्या एक इंच जमिनीवरही कब्जा केलेला नाही, असा दावा शहा यांनी केला.

संरक्षण मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक

तवांगमधील यांगत्से येथे चीनने केलेल्या आगळीकीचे गांभीर्य लक्षात घेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार तसेच लष्कर प्रमुख मनोज पांडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी परराष्ट्र खात्याचे सचिव विनयमोहन क्वात्रा आणि संरक्षण खात्याचे सचिव गिरीधर अरमाने उपस्थित होते.

संसद हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

संसद हल्ल्याला २१ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत उभय सदनात कामकाजाच्या प्रारंभी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुरक्षा रक्षकांनी दाखविलेल्या धाडसामुळे लोकशाहीचे मंदिर वाचू शकले, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. १३ डिसेंबर २००१ हा दिवस देशाच्या इतिहासातला भयंकर दिवस म्हणून ओळखला जाईल. आपल्या सुरक्षा रक्षकांनी शौर्य दाखवून दहशतवाद्यांचे प्रयत्न उधळून लावले, असे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंग यांनी सांगितले. कामकाजास सुरुवात होण्यापूर्वी सकाळी संसद भवन परिसरात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवरांनी शहिदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा :

Back to top button