Tawang Clash: तवांग प्रकरणी विरोधकांचा केंद्र सरकारवर निशाणा | पुढारी

Tawang Clash: तवांग प्रकरणी विरोधकांचा केंद्र सरकारवर निशाणा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अरुणाचल प्रदेशाच्या तवांग सेक्टरमध्ये (Tawang Clash) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत अनेक सैनिक जखमी झाले आहेत. देशभरातून सर्वत्र चिनी सैनिकांच्या या कृत्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. विरोधक या प्रकरणात सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेस, एआयएमआयएमने याप्रकरणी निवेदन देण्याची मागणी मंगळवारी (दि. १३) सकाळी केली. तर, तवांग सेक्टरमध्ये स्थिती संवेदनशील आहे. परंतु, या भागात सध्या शांतता असल्याची माहिती भाजप खासदार तापिर गाओ यांनी दिली आहे.

दरम्यान, (Tawang Clash) सरकारने ढिम्मपणा सोडून असे प्रकार सहन करणार नाही, हे चीनला दाखवून देण्याची वेळ आली आहे, अशी भावना काँग्रेसने व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करीत मोदी सरकारवर टीका केली. भारतीय जवान शौर्याचा गर्व आहे. सीमेवर चीनकडून करण्यात येणारी आगळीक कुठल्याही प्रकारे स्वीकारली जाणार नाही. गेल्या दोन वर्षात आम्ही सातत्याने सरकारला जागवण्याचे प्रयत्न करीत आहोत. पंरतु, मोदी सरकार केवळ त्यांची राजकीय प्रतिमेचा बचाव करण्यासाठी प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळेच चीनची मुजोरी वाढली असल्याचे जयराम रमेश म्हणाले.

सरकारने देशाला अनेक दिवसांपर्यंत अंधारात ठेवले आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना या घटनेची माहिती का देण्यात आली नाही? असा सवाल एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला. सरकारने स्थितीचे विवेचन संसदेत करावे. भारतीय जवानांवर पूर्ण विश्वास आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. भारताच्या सीमेत कुणीही घुसखोरी केली नाही, कुणी घुसणारही नाही, असा विश्वास पंतप्रधानांनी गलवानच्या घटनेनंतर दिला होता. आताही ते असेच म्हणतील? देशाकडून प्रत्युत्तर का दिले जात नाही? असे सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.

Tawang Clash : चीनच्या बाजूने असलेला व्यापार असंतुलन चिंताजनक

संसदेत सरकारकडून उत्तर मागण्याची आवश्यकता आहे. सरकारने या मुद्दयावरून पळ काढू नये. देशाचे जवान जखमी असताना चीनच्या बाजूने असलेला व्यापार असंतुलन चिंताजनक आहे. हिंसक झटापटीचे कारण काय होते? गोळीबार झाला का की गलवान सारखी स्थिती होती? किती सैनिक जखमी झाले, त्यांची स्थिती काय? चीनला कठोर संदेश देण्यासाठी संसद सैनिकांना सार्वजनिक समर्थन का देऊ शकत नाही? असे सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला. लष्कर कुठल्याही क्षणी चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी समक्ष आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात कमकुवत राजकीय नेतृत्व चीनकडून करण्यात येणाऱ्या अपमानाचे कारण ठरले आहे. संसदेत यावर तत्काळ चर्चेची आवश्यकता आहे. या मुद्दयावर उद्या स्थगन प्रस्ताव सादर करणार असल्याचे ओवेसी म्हणाले.

देशाचे जवान देशाची प्रतिष्ठा आहे. मी त्यांच्या शौर्याला सलाम करतो. जखमी जवान लवकरात लवकर बरे व्हावे, अशी देवाकडे प्रार्थना करतो.

– अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

गत दोन वर्षांपासून चीन अनधिकृतरित्या भारतातील भूभागाचे अधिग्रहण करीत आहे. पंतप्रधान कुठे आहेत? चीन सैनिकांकडून विविध बिंदूवर भारताच्या क्षेत्रावर करण्यात आलेल्या अनधिकृत कब्ज्याची योग्य माहिती पंतप्रधानांनी लोकसभा आणि राज्यसभेत द्यावी.

– रणदीप सुरजेवाल, खासदार, कॉंग्रेस

चीनने पुन्हा एकदा भारतीय जवानांना प्रवृत्त केले आहे.आम्हचे जवान शौर्याने लढले. काही जखमी झाले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दयावर आम्ही सरकार सोबत आहे. या घटनेवर राजकारण करू नये. पंरतु, एनएसी जवळील सर्व बिंदूंवर एप्रिल-२०२० पासून चिनी अतिक्रमण तसेच बांधकामासंबंधी मोदी सरकार प्रामाणिक असले पाहिजे. सरकारने य मुद्दयावर संसदेत चर्चा करीत देशाला विश्वास देण्याची आवश्यकता आहे.जवानांचे शौर्य तसेच बलिदानाचे सदैव ऋणी राहू.

-मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रीय अध्यक्ष, काँग्रेस

भारत तसेच चीनच्या जवानांमध्ये झालेल्या झटापटीमध्ये काही भारतीय जवान जखमी झाले आहेत. परंतु, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला (पीएलए) जास्त नुकसान झाले आहे. भारतीय जवान आपल्या जमिनीवरून एक इंचही मागे हटले नाहीत. परंतु, चीनी सैनिकांचे हे कृत्य निंदनीय आहे. मॅकमोहन लाईनवर सातत्याने अशाप्रकारची घटना होणे भारत-चीनच्या संबंधांसाठी योग्य नाही. पीएलए कडून चुकीचे कृत्य करण्यात आले आहे. भारतीय सैनिक सीमेवर एकत्रित झाले आहे. चीनने कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या कृत्याला प्रत्युत्तर दिले जाईल. तवांग मध्ये भारतीय लष्कर, आयटीबीपीच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. सध्या स्थिती संवेदनशील पंरतु शांत आहे. अशाप्रकारची घटना घडणे योग्य नाही.

– तापिर गाओ, भाजप खासदार

– तापिर गाओ, भाजप खासदार

हेही वाचलंत का ? 

Back to top button