Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शरद पवार नाराज | पुढारी

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शरद पवार नाराज

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : Maharashtra Politics : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांचा भावी सहकारी असा उल्लेख केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नाराज असल्याचे समजते.

महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल असताना अशी वक्तव्ये कशाला करायची, अशा शब्दांत पवार यांनी आपली नाराजी शिवसेनेच्या नेत्यांकडे व्यक्त केली आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आलो तर भावी सहकारी असा उल्लेख केला होता.

Maharashtra Politics  : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना संदेश देण्यासाठीच चर्चा?

मुख्यमंत्र्यांच्या या गुगलीने सगळेच बुचकळ्यात पडले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना संदेश देण्यासाठीच हे वक्तव्य केल्याचीही चर्चा आहे. सरकारमध्ये काही निर्णय आणि विषयावर कुरबुरी आहेत. या कुरबुरींमुळे महामंडळाच्या नियुक्त्याही रखडल्या आहेत. त्यामुळे मित्रपक्षांना मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिल्याचे म्हटले जाते.

शुक्रवारी राज्यभर राजकीय गोंधळ उडवणार्‍या उद्धव ठाकरे यांच्या वक्‍तव्याची दखल शरद पवार यांनीही घेतली. कारण नसताना आणि सर्वकाही ठीक सुरू असताना अशी वक्तव्ये करून वातावरण बिघडवू नये, अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे.

पवारांची नाराजी समजताच सेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पवारांची नाराजी मुख्यमंत्र्यांच्या कानी घातली. त्यानंतर राऊत यांनी शिवसेना महाविकास आघाडीसोबतच पाच वर्षे राहणार, अशी कमिटमेंट दिल्याची चर्चा आहे.

Maharashtra Politics  : आमची 5 वर्षांची कमिटमेंट

सरकार पाच वर्षे चालवायची आमची कमिटमेंट आहे. शिवसेना ही शब्दांची पक्की असते. शिवसेना कधी विश्वासघात करत नाही आणि पाठीत खंजीर खुपसत नाही. दिलेला शब्द पाळणे ही शिवसेनेची खासियत आहे. आम्ही सगळे त्याच मार्गाने चालतो. त्यामुळे हे सरकार पडेल, या भ्रमात कुणी राहू नये, असे स्पष्ट करीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना-भाजप युतीच्या शक्यतेला शनिवारी पूर्णविराम दिला.

कुणाला पतंग उडवायचे असेल तर त्यांनी जरूर उडवावेत. तो पतंग कधी कापायचा आम्हाला माहिती आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये भाजप नेत्यांचा उल्लेख भावी सहकारी असा केल्याने या विधानावरून तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र येणार का? याची चर्चा रंगली आहे.

भाषण करण्याची एक खास शैली

मुख्यमंत्री ठाकरे यांची भाषण करण्याची एक खास शैली आहे. त्या पद्धतीने त्यांनी हे भाषण केले आहे. त्यांनी असे कुठेही म्हटले नाही की नवीन आघाडी होईल आणि आम्ही या सरकारमधून बाहेर पडू.

त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की ज्यांना भावी सहकारी व्हायचे आहे ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. चंद्रकांत पाटील म्हणाले की आम्हाला माजी मंत्री म्हणून नका. कुणीतरी तिकडे आहेत की ज्यांना इकडे यायचे आहे. त्यांच्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी संकेत दिलेत की तुम्ही इकडे या, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या विधानाचे तीन पक्षांत काही पडसाद उमटले आहेत का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर पडसाद वगैरे काही नाही. सर्व काही शांत आहे. आलबेल आहे. कोणतेही वादळ नाही. कमालीची शांतता आहे. त्या विधानाने कुणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर फुटू द्या. पण हे सरकार तीन वर्षे चालणार आहे, असे त्यांनी ठासून सांगितले.

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर खुलासा

भावी सहकारी या उल्लेखावरून राजकीय संभ्रम निर्माण झाला असताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली.

मात्र, या चर्चेचा तपशील सांगण्यास संजय राऊत यांनी नकार दिला. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. पण ही आतली चर्चा बाहेर का सांगू?, असा सवाल करत संजय राऊत यांनी त्यावर अधिक बोलण्यास नकार दिला.

गणेशोत्सव सुरू आहे. उद्या विसर्जन होणार आहे. त्यामुळे गणपतीचे दर्शन घेतले, असे राऊत म्हणाले.

हे ही वाचलं का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

 

Back to top button