पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर तमिळनाडूतील किनारपट्टीला मंदोस चक्रीवादळाने (Mandous Cyclone) धडक दिल्याने हाहाकार उडाला आहे. या वादळामुळे ममल्लापुरम आणि राजधानी चेन्नईसह तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या काही भागात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून, ९८ जनावरे दगावली आहेत. १५१ घरांचे व झोपड्यांचे नुकसान झाले आहे.चेन्नईत ४०० झाडे उन्मळून पडली. दरम्यान ६५ ते ७५ किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग ८५ किमीपर्यंत पोहोचला आहे. या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चेन्नईतील (Mandous Cyclone) अरुम्बक्कम आणि पट्टिनपक्कम भागातही पाणी साचले आहे. साचलेले पाणी काढण्यासाठी मोटार पंप सुरू केले आहेत. शिक्षण विभागाने शनिवारी चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, वेल्लोर, विल्लुपुरम, कांचीपुरम, कुड्डलोर आणि रानीपेट जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
तामिळनाडूमध्ये सुमारे १६ हजार पोलीस कर्मचारी आणि १ हजार ५०० होमगार्ड सुरक्षा, मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची ४० सदस्यीय टीम, १२ जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाच्या टीम कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सुमारे ४०० कर्मचारी कावेरी डेल्टा भागांसह किनारपट्टीच्या प्रदेशात तैनात केले आहेत.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी चेपॉक येथे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री केकेएसएसआर रामचंद्रन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
हेही वाचलंत का ?