पुणे : प्राप्तिकर नोटिसांबाबत सीबीडीटी, अमित शहा यांना भेटू ; पतसंस्था फेडरेशनला किरीट सोमय्यांचे आश्वासन | पुढारी

पुणे : प्राप्तिकर नोटिसांबाबत सीबीडीटी, अमित शहा यांना भेटू ; पतसंस्था फेडरेशनला किरीट सोमय्यांचे आश्वासन

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील पतसंस्थांना आलेल्या प्राप्तिकराच्या नोटिसांबाबत आपण केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना भेटू, असे आश्वासन भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले. चांगले काम करणार्‍या पतसंस्थांच्या पाठीशी मी नेहमी उभा आहे. मात्र, गैरवर्तन करणार्‍या पतसंस्थांचा कारभार उघड केल्याशिवाय राहणार नसल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, संचालक अ‍ॅड. दीपक पटवर्धन, शरद जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांनी बुधवारी (दि.7) सोमय्या यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी झालेल्या संयुक्त चर्चेत ते बोलत होते. फेडरेशनच्या वतीने त्यांना विविध प्रश्नांचे निवेदन यावेळी देण्यात आले.

यावेळी पतसंस्थांना भेडसावणार्‍या अनेक अडचणी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी मांडल्या. प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा, प्राप्तिकर विभागाकडे वर्षानुवर्षे अडकून पडलेल्या रकमा, तसेच सहकार विभाग सहकार्य करत नसल्याने येणार्‍या अडचणीही मांडल्या. त्यानंतर संवाद साधताना सोमय्या म्हणाले, आता मी मैदानात उतरलो आहे. तुम्ही घाबरायचे कारण नाही. प्राप्तिकर नोटिसांबाबत आधी सीबीडीटीकडे दाद मागू. नाहीच झाले तर आपण सोबत लढू. मी तुमच्या सोबत आहे. आपण केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना भेटू. कोणत्याही अडचणींसाठी कधीही या, चांगल्या पतसंस्थांसोबत मी नेहमीच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी बोलताना केला.

Back to top button