नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. पंरतु, ही भेट पुढे ढकलण्यात आल्याचे कळतेय. आज ( दि.८) अमित शहा यांच्यासोबत खासदारांच्या शिष्टमंडळाची बैठक होण्याची शक्यता होती. लवकरच केंद्रीय गृहमंत्री खासदारांची बाजू ऐकून घेतली,असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी दैनिक पुढारीसोबत बोलताना व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी गुरुवारी (दि.९) पुन्हा एकदा वेळ मागण्यात आली असल्याचे राऊत म्हणाले.
सीमाप्रश्नी खासदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र यापूर्वी शहा यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. पत्रातून कर्नाटक राज्य सरकारकडून मराठी बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराची बाब शहा यांच्या निर्दशनास आणून देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले चढवले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे. कर्नाटक सरकार, मुख्यमंत्री आणि इतरांना रोखण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी खासदारांनी निवेदनातून केली आहे.
बेळगाव,कारवार, निपाणी, भालकी आणि बिदर येथील कायद्याचे पालन करणाऱ्या मराठी बांधवांच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी खासदारांनी केली आहे. निवेदनावर विनायक राऊत यांच्यासह सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, सुरेश धानोरकर, अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, सुनील तटकरे, राजन विचारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हेही वाचा :