Share Market Today : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतविषयक धोरणाच्या निर्णयापूर्वी आज बुधवारी शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी स्थिर पातळीवर सुरुवात केली होती. पतधोरण जाहीर होताच दोन्ही निर्देशांकानी किरकोळ वाढ नोंदवली. त्यानंतर चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्स ६२,६०० वर तर निफ्टी १८,६०० वर व्यवहार करत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (आरबीआय) शक्तीकांत दास यांनी आज ( दि. ७) पतधोरण धोरण (RBI Monetary Policy) जाहीर केले. यावेळी रेपो दरात ३५ बेसिस पॉइंट्स (bps) ची वाढ केली. यामुळे रेपो दर ६.२५ टक्क्यांवर गेला आहे.
याआधी वाढती महागाई रोखण्यासाठी रिझव्र्ह बँकेने सलग तीन वेळा रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्सची वाढ केली होती. सध्या आरबीआयच्या पतधोरण समितीने आर्थिक वृद्धीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तटस्थ भूमिका घेत रेपो दरात कमी वाढ केली आहे. 'आरबीआय'च्या पतधोरण समितीची ५, ६ आणि ७ डिसेंबर रोजी बैठक झाली. सुक्ष्म आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन आणि त्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून पतधोरण समितीच्या ६ पैकी ५ सदस्यांनी बहुमताने रेपो दर ३५ बेसिस पॉइंट्सने वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी जाहीर केले. भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आहे. बँक क्रेडिटमध्ये दुपटीने वाढ होत असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. यंदाच्या आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढीचा अंदाज ६.८ टक्के राहील, असे दास यांनी म्हटले आहे.
ओएनजीसी, टीसीएस, एनटीपीसी, विप्रो आणि एचसीएल टेक यांचे शेअर्स आज एनएसईवर पिछाडीवर होते. त्यांचे शेअर्स १.५१ टक्क्यांपर्यंत घसरले. तर बीपीसीएल, एल अँड टी, सिप्ला, अदानी एंटरप्रायझेस आणि एसबीआय लाइफ यांचे शेअर्स आघाडीवर होते.
दरम्यान, अमेरिकेतील तिन्ही प्रमुख निर्देशांक घसरले आहेत. यामुळे आशियाई बाजारातही सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दिसून आली. जपानचा निक्केई ०.६२ टक्क्यांनी, दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.४२ टक्क्यांनी, चीनचा शांघाय कंपोझिट ०.२४ टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ०.३१ टक्क्यांनी घसरला आहे.
NSE डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी ६३५.३५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ५५८.६७ कोटी रुपयांचे शेअर्स ऑफलोड केले आहेत.
हे ही वाचा :