बाळाच्या जन्मापासूनच सुरू करा गुंतवणूक, 'हे' आहेत म्युच्युअल फंड कंपनीचे चिल्ड्रन प्लॅन | पुढारी

बाळाच्या जन्मापासूनच सुरू करा गुंतवणूक, 'हे' आहेत म्युच्युअल फंड कंपनीचे चिल्ड्रन प्लॅन

सद्य:स्थितीत पाल्यांच्या भवितव्यावरून पालकांना भेडसावणार्‍या चिंता पाहता, अनेक आर्थिक कंपन्यांनी मुलांच्या भविष्याला आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी अनेक उत्पादने बाजारात आणली आहेत. भविष्यातील आव्हाने, वाढते खर्च आणि आर्थिक सुरक्षिततेचा विचार केल्यास, बाळाच्या जन्मापासूनच गुंतवणूक करणे हा सर्वात महत्त्वाचा आणि योग्य निर्णय ठरू शकतो.

बाळाचा जन्म होतो तेव्हा त्याचे पालक त्याच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न रंगवितात. मुलाचे शिक्षण, लग्न, नोकरी, व्यवसाय याची चिंता त्यांना भेडसावू लागते. मुलगी झाली तर पालक तिच्या विवाहावरून काळजी करतात. तिच्या विवाहात कोणतीही कसर राहणार नाही यासाठी काही पालक लहानपणापासून रकमेची तरतूद करू लागतात.

आजघडीला देशातील अनेक विमा कंपन्यांनी लहान मुलांसाठी वेगवेगळे प्लॅन आणले आहेत. म्युच्युअल कंपन्यांनीदेखील मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा लक्षात घेता अनेक योजना आणल्या आहेत. पाल्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी कंपन्यांकडून अनेक योजना ऑफर केल्या जात असताना म्युच्युअल फंड योजना मात्र बर्‍याचअंशी लोकप्रिय ठरत आहेत. या कारणामुळेच म्युच्युअल कंपनीच्या माध्यमातून कोणताही व्यक्ती मुलाच्या नावावर लहानसहान गुंतवणूक सुरू करून दीर्घकाळासाठी एक मोठा निधी तयार करू शकते. यासाठी काहीगोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.

जन्माबराबेरच गुंतवणूक सुरू करा

मुलाचा जन्म होताच कुटुंबात आनंदाला उधाण येते. मात्र या आनंदाच्या भरात मुलाच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये. त्याच्या जन्माबरोबरच म्युच्युअल फडच्या एखाद्या चिल्ड्रन प्लॅनमध्ये एसआयपीच्या माध्यमातून मासिक गुंतवणूक तत्काळ सुरू करा. उदा. जन्मानंतर त्याच्या नावाने 5 हजार रुपये दरमहा एखाद्या चिल्ड्रन प्लॅनमध्ये एसआयपी सुरू केली, तर मुलगा जेव्हा 30 वर्षांचा होईल, तेव्हा दरमहा केलेल्या बचतीवर 12 टक्के अंदाजित दराने परतावा मिळेल आणि ती रक्कम सुमारे पावणे दोन कोटी रुपये असेल. म्हणजेच आपला मुलगा तिसाव्या वर्षीच कोट्यधीश होईल. एखाद्या कारणाने मुलगा नोकरी करत नसेल आणि त्याला जॉब मिळत नसेल, तर पावणे दोन कोटी रुपयांच्या या फंडने तो एखादा व्यवसाय सहजपणे सुरू करू शकतो.

म्युच्युअल फंड कंपनीचे चिल्ड्रन प्लॅन

देशभरात काम करणार्‍या जवळपास सर्वच म्युच्युअल फंड कंपन्या जसे एचडीएफसी, एसबीआय, एमएफ, आदित्य बिर्ला, आयसीआयसीआय प्रुव्हेडिंशियल आदींनी मुलांशी निगडित योजना आणल्या आहेत. कोणताही व्यक्ती मुलाच्या जन्माबरोबरच या योजनेत गुंतवणूक करून तो तारुण्यावस्थेत पोहचेपर्यंत चांगला निधी तयार करू शकतो.

अधिक परतावा शक्य

एखादा पालक इक्विटीवर आधारित चिल्ड्रन प्लॅन खरेदी करत असेल, तर त्यात अधिक परतावा मिळण्याची शक्यता राहते. उदा. एसआयपीनुसार 5 हजार रुपये मासिक गुंतवणूक केली तर त्यावर 15 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो आणि पुढील तीस वर्षांत ही रक्कम सुमारे साडेतीन कोटी रुपयांपेक्षा अधिक राहू शकते. या फंडमधील काही भाग मुलाच्या विवाहात खर्च झाला तरी पालकाकडे चांगली रक्कम हाताशी राहते.

केवळ चाईल्ड प्लॅन गरजेचा नाही

म्युच्युअल फंड कंपनीने अशा काही योजना आणल्या आहेत की, त्या चाईल्ड प्लॅनच्या श्रेणीत येत नाहीत; पण परतावा चांगला देतात. यासाठी केवळ चाईल्ड प्लॅनमध्येच गुंतवणूक करावी, असे नाही. याउलट म्युच्युअल फंड योजनांनी गेल्या पाच ते दहा वर्षांत चांगला परतावा दिला आहे आणि त्या योजनेत मुलांच्या नावावर गुंतवणूक करू शकता. या योजनांचे नाव चिल्ड्रन फंडच असावे, असे नाही.

म्युच्युअल फंडमध्ये अनेक पर्याय

म्युच्युअल फंड कंपन्यांनी पालकांच्या उत्पन्नाचे आकलन करत आकर्षक योजना आणल्या आहेत. या प्लॅनमध्ये जोखीम कमी घेणार्‍या पालकांचादेखील विचार केला गेला आहे. अशा पालकांंसाठी डेट आधारित योजना आहेत. मात्र अधिक जोखीम घेऊ इच्छिणार्‍यांसाठी इक्विटी आधारित म्युच्युअल फंड योजनादेखील बाजारात आहेत. साहजिकच, जोखीम कमी असेल तर रिटर्न कमी असेल. इक्विटी योजनांत जोखीम अधिक असते तेव्हा रिटर्न अधिक मिळण्याची शक्यता अधिक राहते.

किमान तीस वर्षांसाठी गुंतवणूक

पालकांनी आपल्या पाल्यांच्या नावावर किमान तीस वर्षे गुंतवणूक करायला हवी. कारण तीस वर्षांत तयार होणारा फंड हा वीस वर्षांत तयार होणार्‍या फंडाच्या दुप्पट असतो. उदा. पाच हजार रुपये दरमहा वीस वर्षांसाठी जमा केले आणि 15 टक्के दराने परतावा गृहीत धरला तर जवळपास 75.79 लाख रुपये मिळतील. मात्र हीच गुंतवणूक याच परताव्याच्या आधारे 30 वर्षांपर्यंत नेली तर सुमारे 3.50 कोटी रुपयांचा निधी जमा होईल. ही बाब कम्पाऊडिंगमध्ये शक्य आहे. म्हणूनच गुंतवणुकीबरोबरच कालावधीदेखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे.

विनिता शाह

Back to top button