Hackers Attacked ICMR Website : दिल्ली एम्सनंतर सर्वोच्च वैद्यकीय संस्थेची वेबसाईट हॅकिंगचा प्रयत्न; यंत्रणा सावध | पुढारी

Hackers Attacked ICMR Website : दिल्ली एम्सनंतर सर्वोच्च वैद्यकीय संस्थेची वेबसाईट हॅकिंगचा प्रयत्न; यंत्रणा सावध

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशाची राजधानी दिल्लीतील AIIMS वर सायबर हल्ला झाल्यानंतर काही दिवसांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (ICMR) वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबर रोजी देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्थेच्या वेबसाइटवर 6,000 वेळा हॅकिंगचे प्रयत्न करण्यात आले. आयपी ॲड्रेसच्या माध्यमातून हे हॅकिंग हाँगकाँगमध्ये ब्लॅक लिस्टेड असणाऱ्या मशिनवरुन करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. (Hackers Attacked ICMR Website)

विशेष म्हणजे 23 नोव्हेंबरला सकाळी 6.45 वाजता दिल्ली एम्सचा सर्व्हर हॅक झाला होता. सर्वप्रथम ही बाब इमर्जन्सी लॅबच्या कॉम्प्युटर सेंटरच्या निदर्शनास आली, त्यानंतर हळुहळू रॅन्समवेअर हल्ला करून हॉस्पिटलची संपूर्ण संगणकीय यंत्रणा हॅकर्सच्या ताब्यात गेली. यानंतर सर्व्हरर्सचे फॉरमॅटींग करुन हॅकर्सच्या तावडीतून संगणकीय यंत्रणा मुक्त करण्यात आली. एकीकडे दिल्ली पोलीस या हॅकिंगचा तपास करत आहेत तर दुसरीकडे इंडिया कॉम्प्युटर इमर्जन्सी टीमचे (CERT-IN) तज्ज्ञ हॅकर्सचा ऑनलाइन सामना करण्याचा प्रयत्न करत आहेत. एम्समध्ये दरवर्षी ३८ लाख रुग्णांवर उपचार केले जातात. या सायबर हल्ल्यामुळे रुग्णांचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता आहे. (Hackers Attacked ICMR Website)

एम्स सायबर हल्ल्याप्रकरणी २ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हे दोघेही सिस्टीम अॅनालिस्ट आहेत. दोघांना यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने एम्स प्रशासनाने दोघांनाही निलंबित केले आहे. दरम्यान, AIIMS चे 50 पैकी 30 सर्व्हर अँटी व्हायरस बसवून स्कॅन करण्यात आले आहेत. (Hackers Attacked ICMR Website)

सध्या हॅकर्सकडून मोठ्या रुग्णलयांच्या सर्व्हरला लक्ष केले जाते. या हॅकिंगद्वारे रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांचा डेटा चोरला जातो. त्यानंतर हा डेटा मोठ्या किंमतीला ऑनलाईन विकला जातो. या हॅकिंगच्या घटनेद्वारे डेटा विक्री करण्याचे मोठे रॅकेट आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रीय असल्याची माहिती पुढे आली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालायातील सर्व्हर हॅक करुन यातील रुग्णांचा डेटा हॅकर्सकडून विकण्यात आला. त्यानंतर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाला या हॅकिंगचा फटका बसला. तामिळनाडूतील एका मल्टीस्पेशालिटी रुग्णालयातील सर्व्हर हॅक करुन त्यांचा डेटाची ऑनलाईन विक्री करण्यात आली.

अधिक वाचा :

Back to top button