

पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : दिवाळखोरीत गेलेल्या दिवाण हाउसिंग फायनान्स कंपनीचे प्रवर्तक कपिल वाधवान आणि त्यांचे बंधू धीरज यांना देण्यात आलेल्या जामिनाविरोधात सीबीआयने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून मंगळवारी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
कोट्यवधी रुपयांच्या बॅंक कर्ज घोटाळ्यात दिवाण बंधू प्रमुख आरोपी आहेत. दोषारोपपत्र अपूर्ण असल्याचे सांगत विशेष न्यायालयाने वाधवान बंधुंना गेल्या आठवड्यात वैधानिक जामीन दिला होता. त्यानंतर सीबीआयने जामिनाला विरोध करीत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर तात्काळ सुनावणी घ्यावी, अशी विनंती सीबीआयकडून मुख्य न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्याकडे करण्यात आली. यावर मंगळवारी सुनावणी घेतली जाण्याचे संकेत उच्च न्यायालयाने दिले आहेत.
गुन्ह्याची व्याप्ती आणि गंभीरता लक्षात घेता दोन्ही आरोपींना जामीन देण्याची गरज वाटत नाही, मात्र दोघांविरोधातील दोषारोपपत्र अपूर्ण असल्याने त्यांना जामीन द्यावा लागत असल्याची टिप्पणी विशेष न्यायालयाने आपल्या निकालात केली होती.