छावला गॅंगरेप प्रकरण : पीडित कुटुंबीय दाखल करणार पुनर्विचार याचिका | पुढारी

छावला गॅंगरेप प्रकरण : पीडित कुटुंबीय दाखल करणार पुनर्विचार याचिका

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानीतील छावला सामूहिक अत्याचार प्रकरणातील पीडितेचे कुटुंबिय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. पीडितेच्या वडिलांच्या वतीने ही याचिका दाखल केली जाईल. ७ नोव्हेंबरला प्रकरणातील तिन्ही दोषींची न्यायालयाने मुक्तता केली होती. याप्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने तिघांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिल्ली पोलिसांना याप्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करण्याची परवानगी दिली होती.

सर्वोच्च न्यायालयाने मजबूत परिस्थितीजन्य पुराव्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा पीडितेच्या वडिलांनी केला आहे. आरोपी राहुलच्या कारमध्ये आढळलेला रक्ताने माखलेला ‘जॅक’ प्रबळ पुरावा आहे. पंरतु, न्यायालयाने डीएनए पुराव्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा पीडीत कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

आरोपींनी ९ फेब्रुवारी २०१२ च्या रात्री कुतूब विहार परिसरातून कामावरून परतत असलेल्या पीडितेचे अपहरण केले होते. मैत्रीचा प्रस्ताव नाकारल्याने मुख्य आरोपी रवि कुमारने इतर दोघांच्या मदतीने पीडितेचे अपहरण, बलात्कार तसेच तिची हत्या केली होती. दिल्लीतील छावला (नजफगढ) पोलीस ठाण्यात यासंबधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्येनंतर हरियाणातील रेवाडी जिल्ह्यात असलेल्या रोधई गावातील एका शेतात मृतदेह फेकून देण्यात आला होता.

    हेही वाचलंत का ?

 

 

Back to top button