पुढारी ऑनलाईन : श्रद्धा वाडकर खून प्रकरणी तपासात काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. याप्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने तिचा मृतदेह कापण्यासाठी चायनीज चाॅपर वापरल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वाडकर हिचा पहिला गळा आवळून तिला मारले. त्यानंतर या चाकूच्या सहाय्याने तिचे हात-पाय कापल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आफताबच्या मेहरौली येथील फ्लॅटमधून पोलिसांनी अनेक धारदार शस्त्रे जप्त केली आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नार्को चाचणीदरम्यान आफताबने पहिला श्रद्धाचा गळा दाबून तिला मारले. त्यानंतर त्याने चायनिज चाॅपरने (क्लीव्हर) पहिला तिचे हातपाय कापले. त्यानंतर त्याने नार्को टेस्टमध्ये ज्या शस्त्राने श्रद्धाचे शरीर कापण्यात आले होते ते शस्त्र त्याने कोठे टाकले होते हेही पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे पोलिस आफताबच्या जबाबानुसार त्या शस्त्राचा शोध घेत आहेत.
आरोपी आपताबची गुरूवारी (दि.१) दिल्लीतील रोहिणी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (FSL) रूग्णालयात नार्को टेस्ट पूर्ण झाली. यानंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेले हत्यार ज्या दुकानातून खरेदी केले होते ते शोधण्याचा तसेच ही हत्यारे खरेदी केल्यानंतर नेमकी आफताबने कधी हत्या केली याचाही शोध घेण्याचे पोलिस प्रयत्न करत आहेत.
या खूनाच्या आरोपाप्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला १२ नोव्हेंबर रोजी अटक करून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी पाच दिवसांची पुन्हा कोठडीत वाढ करण्यात आली. २६ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने त्याला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.