Shraddha murder case : आरोपी आफताबची नार्को चाचणी पूर्ण | पुढारी

Shraddha murder case : आरोपी आफताबची नार्को चाचणी पूर्ण

पुढारी ऑनलाइन डेस्क : श्रद्धा हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताबची नार्को चाचणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती सागर प्रीत हुडा विशेष सीपी (कायदा व सुव्यवस्था) दिल्ली पोलिस यांनी दिली आहे.

श्रध्दा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला याची गुरुवारी रोहिणी येथील रुग्णालयात नार्को चाचणी घेण्यात आली. सुमारे दोन तास चाललेल्या नार्को चाचणीदरम्यान रुग्णालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात सकाळी 8.40 वाजता आफताबला नेण्यात आले. त्यानंतर सकाळी दहा ते बारा या वेळेत नार्को चाचणी झाली. नार्को चाचणीतून श्रध्दा हत्याकांडाशी संबंधित महत्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे. याआधी पाचवेळा आफताबची पॉलिग्राफ चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी त्याने श्रध्दाची निर्घृण हत्या केल्याची तसेच असंख्य मुलींसोबत संबंध असल्याची कबुली दिली होती.

काही दिवसांपूर्वी पॉलिग्राफ चाचणीसाठी नेले जात असताना आफताबवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. या पार्श्वभूमीवर त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलेले आहे. आफताबची नार्को चाचणी घेण्यात आली, त्यावेळी वरिष्ठ अॅनेस्थेशिया तज्ज्ञ, न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील मानसोपचार तज्ज्ञ तसेच दोन फोटो तज्ज्ञ उपस्थित होते. अॅनेस्थेशिया देण्यात आल्यानंतर आफताबला श्रध्दा हत्याकांडाशी संबंधित विविध प्रश्न विचारण्यात आले. नार्को चाचणीचा अहवाल लवकरच येणार असून त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रूरकर्मा आफताबने श्रध्दाच्या डोक्याचा भाग तसेच शरिराचे इतर अवयव कोठे — कोठे फेकले, तिचा मोबाईल आणि हत्येवेळचे तिचे कपडे कोठे आहेत, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

Shraddha murder case : श्रद्धाला याआधीच ठार मारण्याचा विचार होता, असे सांगत आफताब पूनावालाने पॉलिग्राफ चाचणीत श्रद्धाच्या खुनाची कबुली दिली. दरम्यान, आफताबच्या नव्या प्रेयसीने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली असून, आपल्याशी तो अतिशय चांगला वागला व त्याने अंगठीसह काही भेटवस्तूही दिल्याचे तिने सांगितले. तसेच आपण त्याच्या घरी गेलो तेव्हा फ्रिजमध्ये श्रद्धाच्या शरीराचे तुकडे होते, हे ऐकून आता भयंकर धक्का बसल्याचे तिने सांगितले.

Shraddha murder case : श्रद्धा वालकर खून प्रकरणात खुनी आफताब पूनावालाच्या पॉलिग्राफ चाचणीबाबत न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या सूत्रांनी सांगितले की, चाचणीदरम्यान आफताब शांत होता. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. श्रद्धाला याआधीच ठार मारण्याचा विचार होता, असेही सांगितले. केलेल्या कृत्याचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर, वागण्यात नव्हता. चाचणीत त्याने आपण खून कसा केला, श्रद्धाच्या शरीराचे तुकडे नंतर कुठे व कसे फेकले, याचा तपशील दिला.

Shraddha murder case : दरम्यान, तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रद्धाचा खून १८ तारखेला रात्री ९ च्या आसपास केल्याचे आफताब सांगत आहे; पण त्याच्या मोबाईल रेकॉर्डच्या तपासणीनुसार त्याने त्या दिवशी रात्री १० च्या सुमारास अॅपच्या माध्यमातून जेवण मागवल्याचे स्पष्ट होते. यामुळे एक तर तो खुनाची तारीख चुकीची सांगत असावा किंवा अत्यंत क्रूरपणे त्याने त्यावेळी मृतदेहापाशी जेवण केले असावे, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने आणखी तपास सुरू आहे.

Shraddha murder case : आधी पॉलिग्राफ चाचणी झाली. आता आज करण्यात आलेल्या नार्को चाचणीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस आणखी तपास करतील. मात्र, त्यानंतर गरज पडल्यास आफताबची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा :

Shraddha Murder Case: १ डिसेंबरला होणार आफताबची नार्को टेस्ट; साकेत कोर्टाची परवानगी

Shraddha Murder Case : आफताबला घेवून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर सशस्त्र हल्ला (Video)

Back to top button