पुढारी ऑनलाईन : श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताबची (Shraddha Murder Case) नार्को टेस्ट करण्याची परवानगी साकेत कोर्टाने दिली आहे. दिल्ली पोलिसांनी ही टेस्ट करण्याची परवानगी मागणारी याचिका कोर्टाकडे दाखल केली होती. त्यानंतर साकेत कोर्टाने १ डिसेंबरला आफताबची नार्को टेस्ट करण्याची परवानगी दिल्ली पोलिसांना दिली आहे.
श्रद्धा खून प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून आरोपी आफताब पूनावालाच्या नार्को आणि पॉलीग्राफ टेस्ट प्रक्रियेसाठी कोर्टाकडे याचिका केली होती. या याचिकेत दिली पोलिसांनी कोर्टाकडे आफताबला (Shraddha Murder Case) तिहार जेलमधून रोहिणी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीत (एफएसएल) हजर करण्याची परवानगी मागितली होती. यानंतर दिल्ली साकेत कोर्टाने या टेस्ट करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती दिल्लीचे विशेष पोलिस अधिकारी सागरप्रीत हुडा यांनी सांगितले.
श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावाला याला घेवून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर जमावाने हल्ला केला. सोमवारी (दि.२८) संध्याकाळी मधूबन चौकानजीक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. आफताबला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर झालेल्या हल्ल्यानंतर, त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आज पुन्हा आफताबला पोलिसांच्या कडक सुरक्षेत फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीत (एफएसएल) आणण्यात आले.