Shraddha Walkar Murder Case | काय असते पॉलिग्राफ टेस्ट? ज्यातून श्रद्धाच्या क्रूर हत्येचे कारण होईल उघड | पुढारी

Shraddha Walkar Murder Case | काय असते पॉलिग्राफ टेस्ट? ज्यातून श्रद्धाच्या क्रूर हत्येचे कारण होईल उघड

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील (Shraddha Walkar Murder Case) आरोपी आफताबला पॉलिग्राफ चाचणीसाठी दिल्लीच्या रोहिणी येथील एफएसएल प्रयोगशाळेत नेण्यात आले. यावळी आफताबचा चेहरा काळ्या आणि पांढऱ्या कपड्याने झाकलेला होता. त्याला पॉलिग्राफ चाचणीसाठी दिल्लीतील मेहरौली पोलीस ठाण्यातून बाहेर काढून एफएसएल प्रयोगशाळेत नेण्यात आले. आफताब पूनावालाने बुधवारी आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले होते. यामु‍ळे फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांना त्याची पॉलिग्राफ चाचणी करता आली नव्हती. पोलिस आज गुरुवारी त्याची चाचणी घेण्यासाठी एफएसएल प्रयोगशाळेत घेऊन गेले. तेथे त्याची पॉलिग्राफ चाचणी करण्यात येत आहे.

मंगळवारी दुपारी तीन मानसशास्त्रज्ञ आणि दोन सहाय्यकांसह पाच जणांच्या पथकाने आफताबच्या प्राथमिक चाचण्या केल्या. या पथकाने आफताबच्या पॉलिग्राफ चाचणीपूर्वी तो मानसिकदृष्ट्या सामान्य राहील यासाठी प्रयत्न केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबला त्याच्याविषयी, त्याचा व्यवसाय, निवासस्थान, कुटुंब आणि मित्रांबद्दल सुमारे २० प्रश्न विचारण्यात आले. “शेवटचे काही प्रश्न श्रद्धा वालकरशी संबंधित होते,” असे पोलीस सूत्राने सांगितले.

या चाचण्यांवेळी कोणत्याही मशीन्सचा वापर केला नाही. कारण आफताब पॉलिग्राफ चाचणीसाठी मानसिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी ही प्राथमिक चाचणी होती. आफताब मानसशास्त्रज्ञांसोबत दोन तासांपेक्षा जास्त वेळ होता. “एफएसएल टीमशी संवाद साधताना आफताबची वागणूक सामान्यपणे होती,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

चाचणीसाठी ४० हून अधिक प्रश्न

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉलिग्राफ चाचणीसाठी तपशीलवार प्रश्नावली तयार करण्यात आली होती. ज्याच्या आधारे नार्को चाचणीसाठी ४० हून अधिक प्रश्न तयार केले गेले आहेत. “यात श्रद्धाच्या हत्येचे कारण, हत्येचा कट पूर्वनियोजित होता का, काय हत्यार वापरले होते, त्याच्या मनात अपराधीपणाची भावना आहे का, त्याने पीडितेचा मृतदेह स्वतःच्या हाताने कापला की मशिन्सचा वापर केला, त्याने कुठे त्याची विल्हेवाट लावली अशा प्रश्नांचा समावेश आहे.

पॉलिग्राफ नंतर नार्को टेस्ट

आफताबच्या पॉलिग्राफ चाचणीचा अहवाल उपलब्ध झाल्यानंतर एफएसएल टीम आणि काही डॉक्टर त्याची नार्को अ‍ॅनालिसिस चाचणी करणार आहेत. नार्को चाचणी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये केली जाणार आहे. एफएसएल अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, नार्को चाचणीवेळी डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ आणि फॉरेन्सिक फोटो तज्ज्ञ यांचा समावेश असलेली टीम हजर असेल. त्याच्या श्वासोच्छवासाचा वेग, नाडी, रक्तदाब यावर लक्ष ठेवण्यासाठी आफताबच्या शरीरावर सेन्सर जोडले जातील.

आफताब पूनावाला याला १२ नोव्हेंबर रोजी श्रद्धाच्‍या हत्‍या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली. मे महिन्‍यात आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. यानंतर शरीराचे सुमारे ३५ तुकडे केले. सुमारे तीन आठवडे ते घरी ३०० लिटरच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले. यानंतर अनेक दिवस जंगलात फेकून दिले होते. (Shraddha Walkar Murder Case)

पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे काय?

क्राईम सायकोलॉजी रिव्ह्यू नावाच्या संशोधन जर्नलनुसार, ही एक अशी चाचणी आहे जी सत्य जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके, श्वासोच्छवासातील बदल, घाम फुटणे आदी मानसिक प्रतिसादांचे मोजमाप करते. या चाचणीदरम्यान कार्डिओ-कफ्स अथवा संवेदनशील इलेक्ट्रोड यांसारखी उपकरणे संबंधित व्यक्तीला जोडलेली असतात आणि रक्तदाब, नाडी, रक्त प्रवाह यांच्यातील बदल त्याला प्रश्न विचारल्यावर मोजले जातात. ती व्यक्ती सत्य बोलत आहे की फसवत आहे अथवा अनिश्चित आहे हे निष्कर्ष काढण्यासाठी प्रत्येक प्रतिसादाला संख्यात्मक मूल्य दिले जाते. अशी चाचणी १९व्या शतकात इटालियन क्रिमिनोलॉजिस्ट सिझरे लोम्ब्रोसो यांनी पहिल्यांदा केली होती. त्यांनी चौकशीदरम्यान गुन्हेगारी संशयितांच्या रक्तदाबातील बदल मोजण्यासाठी मशीनचा वापर केला होता. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ विल्यम मार्स्ट्रॉन यांनी १९१४ मध्ये आणि कॅलिफोर्नियाचे पोलिस अधिकारी जॉन लार्सन यांनी १९२१ मध्ये अशीच उपकरणे तयार केली होती.

हे ही वाचा :

Back to top button