

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : श्रद्धा वालकरच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताब पूनावालाने वापरलेले पाच धारदार चाकू हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, या कामासाठी वापरलेली करवत अद्याप सापडलेली नाही.
श्रद्धा खून प्रकरणातील एकेक पुरावे गोळा करताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत असली, तरी रोज काही ना काही नवीन हाती लागत आहे. गुरुवारी पोलिसांनी सांगितले की, आफताबने गळा दाबून मारल्यानंतर श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी विविध प्रकारचे धारदार चाकू वापरले. शिवाय, इलेक्ट्रिक कटर किंवा करवतही वापरली असावी, असा संशय आहे. आफताब शेफ असल्याने त्याला चाकूबाबत पूर्ण माहिती होती. आतापर्यंत पाच ते सहा इंच पाते असलेले पाच चाकू पोलिसांच्या हाती लागले आहेत. ते तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, आफताब पूनावाला याची आज पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली. रोहिणी येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत ही चाचणी करण्यात आली.
माणुसकीला काळिमा फासणार्या श्रद्धा वालकर खून प्रकरणात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. राजधानी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले की, श्रद्धाच्या खुनाचा दिल्ली पोलिस तपास करत आहेत. श्रद्धाची क्रूर हत्या करणारा कुणीही असला, तरी त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी याची खबरदारी पोलिस आणि सरकार निश्चित घेईल.