सीपीआय नेता कन्हैया कुमार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश - पुढारी

सीपीआय नेता कन्हैया कुमार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : सीपीआय नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार लवकरच काँग्रेसवासी होण्याची शक्यता आहे. त्यांनी नुकतीच राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. त्याबरोबरच गुजराजमधील आमदार जिग्नेश मेवानी हेही काँग्रेसच्या संपर्कात आहेत.

सीपीआयमध्ये वरिष्ठ नेते आणि कन्हैयाकुमार यांच्यात सुरू असलेल्या धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कन्हैया कुमार यांची सीपीआयमध्ये कोंडी केली आहे. अनेक वरिष्ठ नेते आपल्याला स्पेस देत नसल्याची भावना कन्हैया कुमारमध्ये आहे.

या पार्श्वभूमीवर कन्हैयाने मंगळवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा केल्याचे समजते.

या घडामोडीबाबत सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा म्हणाले, ‘या संदर्भात फक्त मी ऐकले आहे. मी एवढेच सांगू शकतो की या महिन्याच्या सुरुवातीला ते आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित होते.

त्याने भाषण केले आणि चर्चेत भाग घेतला.’

काँग्रेसला होईल फायदा

कन्हैयाकुमार सारखा फायरब्रँड नेता पक्षात आल्यास काँग्रेसला फायदा होईल, असे अनेक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

कन्हैयामुळे पक्षाला बिहारमध्ये सावरण्याची संधी मिळू शकते. बिहारमध्ये गेल्या तीन दशकांपासून काँग्रेस काही खास कामगिरी करू शकला नाही.

गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतही, मित्रपक्ष आरजेडी आणि सीपीआय (एमएल) च्या तुलनेत काँग्रेसने वाईट कामगिरी केली.

काँग्रेसने लढवलेल्या ७० पैकी केवळ १९ जागांवर विजय मिळविला. तर आरजेडीने १४४ जागांपैकी अर्ध्याहून अधिक जागा जिंकल्या,

तर सीपीआय (एमएल) ने १९ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या.

गळतीनंतर आता नवे नेतृत्व

याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले, ‘पक्षाला विश्वास आहे की कुमार आणि मेवाणी यांच्या प्रवेशामुळे नव्या दृष्टीने पक्षाला चालना मिळेल.

कारण गेल्या दोन वर्षांपासून पक्षाला तरुण नेत्यांची गरज होती. ज्योतिरादित्य शिंदे, सुष्मिता देव, जितिन प्रसाद आणि प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्ष सोडल्यानंतर तरुण नेतृत्वाची गरज आहे.

अशा स्थितीत कन्हैयाकडून पक्षाला काय फायदा होणार, असाही प्रश्न पक्षांतर्गत वेगाने वाढू लागला आहे.

कन्हैयाचा सीपीआय नेतृत्वावर राग आहे.

अशा परिस्थितीत जर त्याला काँग्रेसचे व्यासपीठ मिळाले तर त्यांचे राजकीय वजन वाढेल. पण पक्षाला फायदा होणार नाही, असेही काही नेत्यांचे म्हणणे आहे.

कन्हैया भाजपचा कडवा विरोधक

कन्हैयाकुमार हा भाजपचा कडवा विरोधक आहे. मोदी यांच्या भाषणांतील विसंगती त्याच्या भाषेत तो मांडतो.

अनेक प्रश्नांना बिनतोड भिडल्याने त्याची प्रचंड लोकप्रियता आहे. अनेक भाजप प्रवक्त्यांना टीव्ही डिबेटमध्ये त्याने निरुत्तर केले आहे.

त्यामुळे कन्हैयाचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो.

Back to top button